Pages

आमचं मिशन ज्ञान,संस्कार आणि सर्वांगीण विकास

मराठी बोधकथा

मराठी कथा 


१ कथेचे नाव- घुबड आणि टोळ
एक म्हातारे घुबड झाडाच्या ढोलीत झोपले असता एका टोळाने झाडाखाली गाणे म्हणायला सुरुवात केली. त्याने गाणे म्हणू नये म्हणून घुबडाने त्याला विनंती केली, बाबा रे, तू येथून जा, मला विनाकारण त्रास देऊ नकोस. तुझ्या किरकीरीने माझी झोप मोडते.' यावर तो टोळ त्या घुबडाचा धिक्कार करून त्याला शिव्या देऊ लागला. तो म्हणाला, 'तू लबाड, चोर आहेस, रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस नि दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस.' त्यावर घुबड म्हणाले, 'अरे तू आता आपलं तोंड सांभाळ, नाहीतर मग पस्तावशील.' तरीही टोळ ऐकून घेईना. घुबडाची निंदा करून तो पुन्हा गाऊ लागला, मग घुबडाने त्याची खोटी स्तुती करायला सुरुवात केली, 'बाबा रे, क्षमा कर. तुझं गायन अगदी गोड आहे. माझ्या इतका वेळ ते लक्षात आलं नाही. तुझ्यासारखा गाणारा तूच. तुझ्या गाण्यापुढे कोकीळाही लाजेल. तुझा स्वर सारंगीपेक्षा चांगला आहे. बरी आठवण झाली. माझ्याकडे एक अमृताची कुपी आहे. त्यातले थोडेसं मी तुला देतो. फार वेळ गात राहिल्याने तुझा गळा अगदी सुकून गेला असेल नाही का ?' टोळाला खरोखरच तहान लागली होती, तो घुबडाजवळचे अमृत घेण्यासाठी त्याच्याजवळ गेला. लगेच घुबडाने त्याला उचलून आपल्या तोंडात टाकले.
तात्पर्य
- आपल्याला जे आवडते ते सर्वांनाच आवडेल असे नाही, हे लक्षात घेऊन दुसर्‍याच्या आवडीनिवडीचा जे विचार करीत नाहीत ते शेवटी आपला नाश करून घेतात.

२ अहंकारी राजाला धडा

एक अहंकारी राजा होता. त्‍याला आपल्‍या ऐश्‍वर्याचा आणि राज्‍याचा गर्व होता. तसेच आपली शक्‍ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्‍या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्‍याला गर्व चढायचा. आपल्‍यासमोर तो इतरांना तुच्‍छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्‍याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्‍याचा त्‍याचा प्रयत्‍न असायचा. या कारणांमुळे लोक त्‍याच्‍यावर नाराज असायचे. त्‍याच राज्‍यात एका विद्वान पंडीताने त्‍याला वठणीवर आणण्‍याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्‍या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रतिनमस्‍कारही केला नाही उलट त्‍याने पंडीताला गर्वाने विचारले,’’बोला पंडीत महाराज, तुम्‍हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्‍या, दान पाहिजे असेल तर दान घ्‍या किंवा धन पाहिजे, सोनेनाणे, जमीन, धान्‍य जे काही मागायचे ते तुम्‍ही माझ्याकडून मागून घ्‍या’’ पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला. राजाला व दरबारातील लोकांना पंडीताच्‍या हसण्‍याचे कारण काही कळेना, हसण्‍याचा भर ओसरल्‍यावर पंडीत म्‍हणाला,’’राजन, तुम्‍ही मला काय दान देणार कारण तुमच्‍याकडे मला देण्‍यासारखे काहीच नाही.’’ पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडीताला पुढे काही बोलण्‍याची इच्‍छा आहे काय असे विचारले. त्‍यावर पंडीतजी म्‍हणाले,’’ महाराज, जरा थंड डोक्‍याने विचार करा, तुमचा जन्‍मच मुळी तुमच्‍या इच्‍छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्‍हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्‍हाला जन्‍म दिला म्‍हणून तुम्‍ही जन्‍माला आलात. तुमचे धान्‍यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्‍या लेकरांसाठी अन्‍न पुरविले म्‍हणून तुम्‍ही ते सांभाळत आहात आणि खजिन्‍याचे म्‍हणाल तर धन हे करातून आलेले म्‍हणजेच प्रजेचे देणे आहे, राज्‍य हे तुम्‍हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्‍वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्‍हाला दुस-याने दिलेले असेल तर तुम्‍ही मला काय म्‍हणून देणार आणि दिलेल्‍या गोष्‍टीचा काय म्‍हणून गर्व बाळगणार.’’ एवढे बोलून पंडीताने राजदरबार सोडला व राजाने त्‍यादिवसापासून गर्व पण सोडून दिला,

तात्‍पर्यः- जे आपले नाही त्‍यावर गर्व बाळगणे व्‍यर्थपणाचे आहे.

३ विश्‍वासाला तडा

एका लोककथेनुसार राम नावाच्‍या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता. तो त्‍या घोड्याची काळजी घ्‍यायचा. त्‍यामुळे त्‍या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते. शाम नावाच्‍या एका घोड्याच्‍या व्‍यापा-याने तो घोडा पाहिला आणि त्‍याला तो घोडा फारच आवडला. शामने तो घोडा मिळविण्‍याचे कारस्‍थान रचले. शामने रामच्‍या रोजच्‍या येण्‍याजाण्‍याच्‍या रस्‍त्‍यावर भिका-याचे सोंग घेतले व आजारी असल्‍याचे नाटक करत बसला. दुसरीकडून राम घोड्यावर बसून येत होता तेव्‍हा शाम जोरजोराने विव्‍हळू लागला, गयावया करू लागला. रामने ते पाहिले व तो शामपाशी थांबला. शाम रामला म्‍हणाला,’’मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्‍या गावापर्यंत नेशील का,’’ रामला त्‍याची दया आली, त्‍याने त्‍याला घोड्यावर बसविले, आणि स्‍वतः पायी चालू लागला. थोडे पुढे जाताच शाम त्‍याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्‍याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला. दुस-या दिवशी शाम रामकडे आला व म्‍हणाला,’’ अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्‍हणून मला आजारी भिका-याचे सोंग घ्‍यावे लागले.’’ यावर राम शांतपणे शामला म्‍हणाला,’’ मित्रा, मी तुला मदत केली होती ही गोष्‍ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्‍ट ऐकल्‍यावर जगात कोणीच गरीबांना, गरजूंना मदत करणार नाही. विश्‍वासघात करणे महापाप आहे’’

तात्‍पर्यः- गरजूला मदत करण्‍यापूर्वी तो खरेच गरजवंत आहे याची खात्री करणे सूज्ञपणाचे ठरते.

४ राजा आणि संत

एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्‍या तपश्‍चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्‍था जायचा तेव्‍हा ते संत त्‍यांच्‍याशी बोलत असत. त्‍याच यात्रेकरूकडून त्‍यांना तेथील राजास त्‍या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्‍यास निघाला. जेव्‍हा संतांना ही गोष्‍ट कळाली.तेव्‍हा त्‍या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्‍याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्‍यास येईल, त्‍याच्‍याबरोबर अनेक माणसे येतील, त्‍यां माणसांच्‍या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्‍याने आपणास ध्‍यानसाधना करता येणार नाही. राजा आम्‍हाला दोघांना सामान्‍य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्‍हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्‍या संताने दुस-याला म्‍हटले,'' तू स्‍वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्‍मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्‍यावर म्‍हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्‍या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्‍त ज्ञान मी माझ्या शिष्‍यांना दिले आहे.'' राजाने व त्‍याच्‍याबरोबरच्‍या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्‍य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्‍यांनी सर्वांनी असल्‍या साधूसंतांचा संग नको म्‍हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्‍ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्‍हीही साधू आपल्‍या साधनेत रममाण झाले.


तात्‍पर्य : चांगली गोष्‍ट घडवून आणण्‍यासाठी कधीकधी चुकीच्‍या मार्गाचाही अवलंब करावा लागतो.

५ लालसेपायी जीव गेला

जय आणि विजय यांच्‍यात घनिष्‍ट मैत्री होती. दोघेही पट्टीचे पोहणारे होते. नदीच्‍या पाण्‍यात भरपूर मस्‍ती केली. तितक्‍यात स्‍थानिक प्रशासनाकडून बंधा-याकडून पाणी सोडण्‍यात येत असल्‍याची सूचना देण्‍यात आली. त्‍यामुळे दोघेही नदीच्‍या बाहेर आले. जेव्‍हा बंधा-यातील पाणी सोडण्‍यात आले तेव्‍हा नदीला पूर आल्‍यासारखी स्थिती निर्माण झाली. जय आणि विजय सुरक्षित स्‍थळी थांबले होते. नदीच्‍या पाण्‍याचा ओघ पाहत असतानाच नदीच्‍या प्रवाहात एक घोंगडी तरंगत येत असल्‍याचे दोघांच्‍याही दृष्‍टीस पडतील. विजयला ती घोंगडी ओढून आणावीशी वाटली. जयने त्‍याला थांबविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु विजयने तोपर्यंत पाण्‍यात उडी मारली होती. तो घोंगडीजवळ गेला आणि तिला ओढत असतानाच त्‍याचे संतुलन बिघडले. विजय जितका जोम लावून किना-यावर येण्‍याचा प्रयत्‍न करत असतानाच पाण्‍यात उठणा-या लाटा त्‍याला दूर लोटत असत. मित्र असा संकटात सापडलेला पाहून जय ओरडला,''अरे मित्रा, घोंगडी सोड आणि परत निघून ये'' पण विजय म्‍हणाला,'' अरे जय मी घोंगडी सोडण्‍याचा खूप प्रयत्‍न करतो आहे पण घोंगडीनेच मला धरून ठेवले आहे.'' जयला कळून चुकले की विजयला त्‍या घोंगडीची लालसा निर्माण झाली आहे. विजयने घोंगडीसह किना-यावर येण्‍याचा खूप प्रयत्‍न केला पण तो अयशस्‍वी ठरला. शेवटी तो पाण्‍यात मृत्‍युमुखी म्‍हणतात.


तात्‍पर्य- कोणत्‍याही प्रकारची लालसा प्रसंगी आपल्‍या जीवाशी खेळू शकते.

६ दानाचे महत्‍व

हजरत उमर आपल्‍या रयतेची खूप काळजी घेत असत. ते स्‍वत:ची व आपल्‍या परिवाराची चिंता नकरता जनतेचे दु:ख निवारणार्थ झोकून देत. एका प्रसंगाची गोष्‍ट आहे, काही कारणाने राजधानीत आग लागली, आग इतक्‍या वेगाने पसरली की तिने शहराचा अर्धा भाग व्‍यापून टाकला. लोकांनी खूप पाणी टाकले पण आग आटोक्‍यात येण्‍याची काही चिन्‍हे दिसेनात. हजारो लोकांची घरे, दारे, पिके सगळे जळून खाक झाले. मनुष्‍यहानीही मोठया प्रमाणावर झाली. लोकांचा आक्रोश वाढत होता. आगीचा वणवा पसरतच चालला. आगीचे लोळ भडकत चालले. शेकडो घरे आगीच्‍या भक्ष्‍यस्‍थानी पडत होती. जनतेला एकाच भयाने ग्रासले होते. आग आटोक्‍यात कशी आणायची कशी, आग विझत नसल्‍याने लोकांनी हजरत उमरला उपाय विचारले, तेसुद्धा आग विझविण्‍यात तनमनधनाने व्‍यग्र होते. उमरनी लोकांना सांगितले, ''ही आग म्‍हणजे खुदाचा कोप असावा, तुम्‍ही लोकांनी आता आग विझविण्‍यासाठी पाणी टाकण्‍याचे काम सोडा, गरिबांना अन्नदान करा. कदाचित खुदा यामुळे प्रसन्न होईल आणि आगीपासून आपली सुटका करेल.'' जनतेतील लोक म्‍हणाले,''हजरत साहेब आपण धर्मादाय संस्‍‍थेचे सर्व दरवाजे सगळ्यांसाठी आधीच उघडे ठेवलेले आहेत. कोणीही गरीब आमच्‍याकडे आला तर आम्‍ही त्‍याला दान करतोच. मग आमच्‍यावर तो नाराज कसा'' हजरत उमरने समजावले,''तुम्‍ही जे दान करता त्‍यामागे निष्‍काम भावना नाही. तुम्‍हाला वाटते दानाचे पुण्‍य म्‍हणून तुम्‍हाला सन्‍मान किंवा प्रशंसा हवी असते. या देखाव्‍याला पुण्‍यकर्म म्‍हणत नाहीत.'' हजरत उमरच्‍या खुलाशानंतर जनतेने आपली चूक सुधारली अन आश्‍चर्य म्‍हणजे आग पूर्णपणे विझून गेली. जनतेने खुदाचे व हजरत साहेबांचे आभार मानले.

तात्‍पर्य :- नि:स्‍वार्थ भावनेने केलेले दान कधीही लोकांच्‍या अंतरात्‍म्‍यापर्यंत पोहोचते.

७ संस्‍कारीत मुलेच यशस्‍वी

नैतिक मूल्‍यांचे शिक्षण देणा-या एका शिक्षकाने मुलांसाठी चॉकलेटस मागवली होती. त्‍यांनी सगळ्या मुलांना रांगेत बसवले होते. शिक्षक चॉकलेटस वाटायला सुरुवात करणार इतक्यात शाळेचा शिपाई त्‍या वर्गात येऊन पोहोचला व म्‍हणाला,''सर तुम्‍हाला आताच्‍या आत्‍ता प्राचार्यांनी काही महत्‍वाचे सांगण्‍यासाठी त्‍यांच्‍या कार्यालयात बोलावले आहे.'' शिक्षकांनी चॉकलेटचा डबा हातातून खाली ठेवला व मुलांना म्‍हणाले,'' मुलांनो मला काही कामासाठी प्राचार्यांकडे जावे लागत आहे. खरेतर ही चॉकलेटस मला माझ्या स्‍वत:च्‍या हाताने तुम्‍हाला द्यायची खूप इच्‍छा होती. परंतु मला जावे लागणार आहे. पाहिजे तर तुम्‍ही हाताने चॉकलेटस घेऊ शकता. अन्यथा मी परत आल्‍यावर तुम्‍हाला देईन'' ही चांगली संधी आहे. असा काही विद्यार्थ्‍यांनी विचार केला व त्‍यांनी चॉकलेटस स्‍वत:च्‍या हाताने घेऊन खाल्ली तर काही विद्यार्थ्‍यांनी शिक्षकांची वाट बघण्‍यात वेळ घालविला. शिक्षक परत आले व त्‍यांनी मुलांना विचारले,'' मुलांनो ज्‍यांनी ज्‍यांनी स्‍वत:च्‍या हाताने चॉकलेटस खाल्ली त्‍यांनी आपले हात वर करा'' ज्‍यांनी चॉकलेटस खाल्ली होती त्‍यांनी हात वर केले. मग शिक्षकांनी उरलेल्‍या मुलांना प्रेमाने चॉकलेटस वाटली. काही वर्षानंतर त्‍या शिक्षकांनी त्‍या विद्यार्थ्‍यांची माहिती मिळविली तेव्‍हा त्‍यांना असे दिसून आले की ज्‍या मुलांनी स्‍वत:च्‍या हाताने चॉकलेटस घेतले होते ती मुले सामान्‍य स्‍वरूपातील कामे करून उदरनिर्वाह करत होते तर ज्‍यांना शिक्षकांनी चॉकलेटस दिली ते सर्व विद्यार्थी उच्‍च पदावर काम करत होते. ही सर्व संस्‍कारांची देणगी होती.

तात्‍पर्य :- संस्‍काराने माणूस घडतो. मिळालेली संधी आणि तिचा योग्य वापर करणे हे मानवाच्‍या हाती आहे. चुकीच्‍या मार्गाने गेल्‍यास व संयम न पाळल्‍यास योग्‍य संधी मिळूनही तिचा वापर करता येत नाही.

८ गुरु केले कासवाला

कोणे एके काळी एका नगरात एक वृद्ध एकटाच राहत होता. छोट्याशा झोपडीत राहून तो आजूबाजूच्‍या शेतात छोटीमोठी कामे करून स्‍वत:ची गुजराण करत असे. आपल्‍या गरजा त्‍याने खूपच मर्यादित ठेवल्‍या असल्‍याने त्‍याला फारसा खर्च येत नसे. मात्र हे असताना त्‍याने एक कासव पाळले होते आणि त्‍या कासवावर त्‍याचा फार जीव होता. दुपारी आपले जेवण तयार करताना तो कासवासाठी हरभरे भिजवून त्‍याला देत असे. रिकामा वेळ असताना तो त्‍या कासवाशी संवाद साधत असे. आजूबाजूचे लोक त्‍याचे ते कासवप्रेम पाहून हसत असत. एके दिवशी एक परिचित मनुष्‍य त्‍याला भेटण्‍यासाठी आला. थोडा वेळ इकडचे तिकडचे बोलून झाल्‍यावर त्‍याने त्‍या कासवाला पाहिले व तो मनुष्‍य म्‍हणाला,'' तू इतका घाणेरडा प्राणी कशासाठी पाळला आहेस. सोडून दे त्‍या कासवाला.'' त्‍याच्‍या बोलण्‍याने वृद्धाला खूप वाईट वाटले. वृद्ध म्‍हणाला,''अरे मित्रा, तू असे बोलून माझ्या काळजाला हात घातला आहेस. इतके वाईट तर मी कधीच त्‍या कासवाबद्दल माझ्या मनात किंवा स्‍वप्‍नातसुद्धा विचारत आणत नाही. ते कासव माझ्या गुरुस्‍थानी आहे म्‍हणून माझ्या मनात त्‍याच्‍याबद्दल खूप आदर आहे.'' तो माणूस म्‍हणाला,''ते कासव तुझे गुरु कसे काय बरे ठरते'' वृद्ध म्‍हणाला,'' कासव हे मानवी मनाचे प्रतिक आहे. कासव आपल्‍याला हे शिकवते की त्‍याच्‍यावर जरा जरी संकटाची चाहूल लागली तरी ते जसे स्‍वत:चे अंग आक्रसून कवचाखाली जाते त्‍याप्रमाणेच मानवाने वाईट गोष्‍टींची जराशी चाहूल जरी लागली तरी त्‍यापासून लांब राहिले पाहिजे. कासवाप्रमाणे आपण आपल्‍या मनाला वाईट गोष्‍टींपासून अंग चोरण्‍याचा प्रयत्‍न केला तर मानवाचे त्‍यात भले आहे.''

९संस्कार

अनेक वर्षांपूर्वी बकुमार नावाचा कुख्यात दरोडेखार होऊन गेला. सिंधुराज राजाच्या राज्यात त्याने लोकांचे जगणे मुश्किल करून टाकले होते. तो श्रीमंतांना तर लुटत असेच, परंतु गरिबांनाही सोडत नसे. गोरगरीब शेतकरी, कामगारांनी आयुष्यभर कष्ट करून कमावलेले चार पैसे हडप करण्यास तो जराही संकोच बाळगत नसे. लोक त्याला हात जोडून विनवण्या करत असत. परंतु त्याला तो मुळीच भीक घालत नसे. अत्यंत निर्दयीपणे त्याचा लूटमारीचा धंदा सुरूच होता व त्याचे क्रौर्य दिवसेंदिवस वाढत होते. हजारो निरपराध लोकांच्या त्याने हत्या केल्या. जो कुणी त्याला विरोध करील, त्याला क्षमा करणे तर दूरच, त्यांना तो जिवंत सोडत नसे. सिंधुराज राजासमोर नागरिकांनी एकत्रितरीत्या बकुमारविरोधात तक्रार केली. त्यानंतर राजाने सगळी सेना त्या दरोडेखोराच्या मागावर सोडली. बकुमार अनेक महिने सैन्याला चकवा देऊन धुमाकूळ घालतच राहिला. परंतु त्याला पकडण्यात सैनिकांना एके दिवशी यश आलेच. त्याला राजासमोर हजर करण्यात आले. राजाने त्याला ताबडतोब फासावर लटकवण्याची आज्ञा दिली. बकुमारला झालेली शिक्षा ऐकून त्याचे अनेक नातेवाईकही त्याला येऊन भेटायला आले. त्याची आईदेखील त्याला भेटण्यास आली. परंतु आई सोडून तो सर्वांना भेटला. आईला मात्र त्याने भेट नाकारली. याचे कारण विचारले असता तो म्हणाला, ‘लहानपणी मी सर्वप्रथम एक सुवर्णमुद्रा चोरली होती. ही चोरलेली मुद्रा मी आईला नेऊन दिली. त्या वेळी तिने माझी प्रशंसा केली, माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. जर तिने मला त्याच दिवशी फटकारले असते, चापट मारली असती तर हे दिवस पाहावे लागले नसते व मी दरोडेखोरही झालो नसतो.’
कथासार : पाया मजबूत आहे की ठिसूळ यावरच इमारत किती मजबूत असेल हे ठरत असते. तशाच प्रकारे मुलांवर लहानपणीच चांगले संस्कार केले गेले तर त्याच्या चांगल्या चारित्र्याचा पाया रचला जातो. वाईट संस्कार माणसाला अधोगतीच्या मार्गावर घेऊन जाण्यास कारणीभूत ठरतो.

१० कथेचे नाव चांगला राजा
एकदा एका तळ्यातला बेडकांना वाटले, की आपल्याला एक राजा हवा. म्हणून त्यांनी देवाकडे तशी मागणी केली. तेव्हा देवाला हसूच आले व त्याने 'हा घ्या राजा !' म्हणून एक लाकडी ओंडका तळ्यात टाकला. तो पाण्यावर पडताच पाणी उसळले. ते पाहून सगळे बेडूक घाबरले आणि बाजूला जाऊन बसले. थोड्या वेळाने पाणी शांत झाल्यावर तो ओंडका काही हालचाल करीत नाही असे पाहून त्याच्यावर चढले व उड्या मारू लागले. मग त्यांना वाटले की या राजापेक्षा दुसरा चांगला राजा हवा. तेव्हा त्यांनी देवाची प्रार्थना करून दुसरा चांगला राजा पाठवण्याची विनंती केली. देवाने एक बगळा पाठविला. त्याने बेडकांना मारून खायला सुरुवात केली. म्हणून बेडकांनी देवाकडे अजून चांगल्या राजाची मागणी केली. ते ऐकून देव म्हणाला, 'मी तुम्हांला पहिला राजा पाठवला होता तो तुम्हांला आवडला नाही. आता तुमचं कर्म तुम्हीच भोगा.'
तात्पर्य
- देवाने ज्या स्थितीत ठेवले आहे त्यात समाधानी असावे

११ कथेचे नाव- कोल्हा
एका कोल्ह्याचे शेपूट लोखंडी सापळ्यात सापडले असता ते तोडून तो पळाला. प्रथम त्याला आनंद झाला की प्राणांवरचे शेपटीवर निभावले. पण जेव्हा तो आपल्या मंडळीत जाऊ लागला, तेव्हा त्याला आपल्या लांडेपणाचे फार वाईट वाटून तो मनात म्हणाला, 'मी मेलो असतो तर बरं झालं असतं. पण ही अप्रतिष्ठा वाईट, पण जे झाले त्याला उपाय नाही. आता हेच कसं शोभवून नेलं म्हणजे झालं ! यासाठी काय बरं युक्ती करावी ?' याचा तो विचार करीत असता त्याला एक युक्ती सुचली ती अशी की आपण सर्व कोल्हे मंडळींना एकत्र जमवून सांगावे की, 'माझी शेपटी मी तोडून टाकून ही भूषणाची नवी पद्धत काढली आहे. ही चांगली आहे अन् तुम्हीसुद्धा अवश्य करावं.' मग त्याने सगळ्या कोल्ह्यांना आपल्या घरी बोलावले व आपल्या युक्तीप्रमाणे त्यांच्यापुढे भाषण दिले. तो म्हणाला, 'अहो, या शेपटीपासून काहीच फायदा नाही. आपल्याला शेपटी म्हणजे ओझंच. शेपटी तोडून टाकल्यानं एक प्रकारचं सौंदर्य येऊन शिवाय पळण्यातली अडचण दूर होते. मी ह्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे नि शेपटी तोडल्यापासून सुखी आहे. हे सुख तुम्हाला प्राप्त व्हावं असं मला वाटलं.' इतके बोलून आपले कितीजण ऐकतात हे पाहण्यासाठी तो सगळ्यांकडे पाहू लागला. इतक्यात एक म्हातारा कोल्हा त्याची लबाडी ओळखून मान वाकडी करून म्हणाला, 'अहो, पंडित महाराज, आपली हुषारी पुरे. शेपटी काढल्यामुळे तुमचं कल्याण झालं असेल, यात शंका नाही. अन् आमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्हीही आपली शेपटी कापून टाकू. तोपर्यंत तुम्ही आम्हाला आग्रह करू नये हेच बरं.'
तात्पर्य
- आपली अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आपले दोष हे नसून गुण आहेत असे बरेचजण सांगतात पण शहाणे लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत.
१२ कथेचे नाव - जगण्याचे भान
एक तरुण माणूस फार छान्दिष्ट व उधळ्या होत्या. त्याने आपली सगळी मिळकत दारू, जुगार सारख्या व्यसनात घालविली. मग तो दरिद्री होऊन भिकार्‍यासारखा अरण्यात फिरू लागला. हिवाळ्यात एके दिवशी चांगले कडक उन्ह पडले होते. अशा वेळी तो माणूस नदीकाठी फिरत असता जवळच्या एका आंब्याच्या झाडावर एक कोकिळा बसलेली त्याने पाहिली. कडक उन्ह व कोकिळा पाहून त्याला वाटले की, खरंच उन्हाळा आला व आता पांघरुणाची काही गरज नाही, असा विचार करून त्याने आपले काही कपडे गहाण ठेवले व पैसे काढून तो आपल्या मित्राबरोबर जुगाराचा डाव खेळायला गेला. तेथे त्याने सगळे पैसे जुगारात घालविले. संध्याकाळी थंडी पडली; तेव्हा त्याला थंडीमुळे आजारपण आले. उन्हाळा असून असे कसे झाले याचे आश्चर्य करीत तो पुनः नदीवर गेला तर तेथे तो कोकीळ पक्षी थंडीने गारठून झाडाखाली मरून पडलेला त्याला दिसला. तो प्रकार पाहून तो चांगलाच शुद्धीवर आला व मग त्या पक्ष्याला म्हणाला, 'अरे, मी तुझ्यावर विश्वास ठेवून आपले कपडे गहाण ठेवण्याचा मूर्खपणा केला, तू मला फसवलंस आणि स्वतःचाही नाश करून घेतलास.'
तात्पर्य
- व्यसनी माणूस काही वेळा इतका बेसावध असतो की, त्याला सभोवतालच्या गोष्टीचेही भान रहात नाही.

१३ कथेचे नाव-अविचार
एका शिकार्‍याने रानात एक कोल्हा पाहिला. तो इतका सुंदर दिसत होता की, त्याचे कातडे आपल्याजवळ असावे अशी त्या शिकार्‍याला इच्छा झाली. त्याने त्या कोल्ह्याचे बीळ शोधून काढले व त्या बिळाच्या तोंडापुढे एक खड्डा खणला. नंतर त्या खड्ड्यात काही वाळलेली झुडपे घातली व त्यावर मोठा मांसाचा तुकडा ठेवला. कोल्हा तो मांसाचा तुकडा पाहून तेथे येईल व खड्ड्यात पडेल असे त्याला वाटले. सर्व तयारीनंतर तो शिकारी एका झाडापाठीमागे लपून बसला. थोडया वेळाने कोल्हा बाहेर आला व समोरच असलेला मांसाचा तुकडा पाहून तो खावा असे त्याला वाटले; पण त्यात काहीतरी कट असावा असे वाटून तो पुन्हा आपल्या बिळात जाऊन बसला. इतक्यात एक वाघ तेथे आला. काही विचार न करता त्याने त्या मांसाच्या तुकड्यावर झडप घातली व तो खड्ड्यात पडला. त्याच्या पडण्याचा आवाज त्या शिकार्‍याने ऐकला व तो धावत तेथे गेला. खड्ड्यात कोल्हा पडला असे समजून त्याने खड्ड्यात उडी मारली, तेव्हा वाघाने त्याला फाडून खाल्ले.
तात्पर्य
- अविचाराने नेहमी अनर्थ घडत असतात.

१४ कथेचे नाव-अतिरेक नको
एकदा एक राजहंस एका बगळ्यास म्हणाला, 'काय रे तू आधाशी ! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागेपुढे पहात नाहीस. बरं-वाईट, नासकं हा फरकसुद्धा तुझ्या खादाड जिभेला समजत नाही. माझं पहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतु तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा असणं बरं नव्हे. ज्या वेळी जे मिळेल ते खावं अन् सुखी राहावं. खाण्याचा पदार्थ दिसला की तो खावा हेच शहाणपणाचं. असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला एक मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे दुसर्‍या कमळे असलेल्या तळ्यात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे लावले होते, त्यात तो सापडला.
तात्पर्य
- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको

१५ कथेचे नाव- बाप आणि मुली
एका गृहस्‍थाला दोन विवाहित मुली होत्‍या व त्‍या दोघीही एकाच गावात राहत होत्‍या. एका मुलीचे लग्‍न व्‍यवसायाने कुंभारकाम करणा-या मुलाशी झाले होते तर दुसरीचे लग्‍न शेतकरी मुलाशी झाले होते. दोघींचेही संसार अगदी सुखात चालू होते.
एके दिवशी कोणत्‍यातरी कारणाने त्‍या दोघीही मुली आपल्‍या मा‍हेरी परत आल्‍या तेव्‍हा वडिलांनी मुलींना विचारले,’’तुमचे दोघींचेही कसे काय सुरु आहे? आपल्‍या संसारात दोघीही सुखी आहात ना.’’ शेतक-याशी लग्‍न झालेली मुलगी म्‍हणाली,’’ बाबा मी सर्व दृष्‍टींनी सुखी आहे. तुम्‍ही देवभक्त आहात म्‍हणून तुम्‍हाला एक सांगते की, माझ्यासाठी एक विनंती देवाकडे करा की यंदा पाऊसकाळ जरा लवकर सुरु होऊ दे म्‍हणजे आमच्‍या शेतात भाजीपाला चांगला पिकेल व आम्‍हाला जरा चांगले उत्‍पन्न मिळेल.’’ हे ऐकताच कुंभाराकडे लग्न होऊन गेलेली मुलगी म्‍हणाली,’’ बाबा हिच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तुम्‍ही देवाची मुळीच प्रार्थना करू नका. उलट तुम्‍ही देवाला अशी विनंती करा की निदान येता एक महिना तरी पाऊस पाडू नकोस म्‍हणून. कारण माझ्या धन्‍याला मडकी पक्की भाजण्‍यासाठी आवे लावता येतील आणि चांगली भाजलेल्‍या मडक्यांना बाजारात चांगला भाव मिळून आम्‍हाला चांगले उत्‍पन्‍न मिळेल.’’ दोन मुलींच्‍या या परस्‍परविरुद्ध मागण्‍या ऐकून ‘काय करावे’ हे कळेनासे होऊन तो गृहस्‍थ मुलींना म्‍हणाला,’’ मुलींनो मी तुमच्‍या दोघींचीही विनंती देवाकडे सांगतो पण यात निर्णय काय घ्‍यायचा तो देवालाच घेऊ दे.’’
तात्‍पर्य – जेव्‍हा आपल्‍याच माणसांकडून आपल्‍याला परस्‍परविरुद्ध गोष्‍टी करण्‍यासाठी गळ घातली जाते तेव्‍हा कुठलीच गोष्‍ट न करणे हे हितावह ठरते.

१६ कथेचे नाव :- सोन्‍याचा मुकुट आणि चांदीचे पाय
एका मोठ्या शहरात भगवान श्रीविष्‍णुचे मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त त्‍या मंदिरात दर्शनासाठी येत असत. हळूहळू मंदिराची ख्‍याती वाढू लागली, भक्तांची गर्दी होऊ लागली, मंदिराचा विस्‍तार होऊ लागला मग काही लोकांनी ठरविले
भगवान विष्‍णुला एक सोन्‍याचा मुकुट करावा. त्‍यासाठी निधी गोळा करण्‍याचे ठरविले. गावाच्‍या बाजूलाच एक अनाथ, अपंग मुलांचा आश्रम होता. त्‍या आश्रमालाही गावातील काही लोक
दानधर्म करत. गावात भिकुशेठ नावाचे
एक श्रीमंत सावकार राहात होते.
भिकुशेट आपल्‍या पैशातून, नफ्यातून काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत
असत. भक्तमंडळींना वाटले की भिकुशेटसारखा दिलदार मनाचा माणूस आपल्‍याला मदत करेल. सगळे मिळून भिकुशेटकडे गेले. भक्तमंडळीना आपल्‍या पेढीवर आलेले पाहून भिकुशेटला मोठा आनंद झाला. त्‍यांनी भक्तांचा मोठा आदरसत्‍कार केला. लोकांनी भगवान श्रीविष्‍णुसाठी सोन्‍याचा मुकुट करण्‍याचे सांगितले व भिकुशेटकडून मदतीची मागणी केली. यावर भिकुशेट म्‍हणाले,''मंडळी मी तुमच्‍या कामात काही मदत करू शकत नाही कारण मी विष्‍णुला सोन्‍याचा मुकुट करण्‍यापेक्षा चांदीचे पाय करण्‍याचा विचार करत आहे.'' लोक म्‍हणाले आम्‍हाला निश्चित
काय ते खरे सांगा. भिकुशेट सर्वांना दोन दिवसांनी येण्‍यासाठी सांगितले. दोन दिवस निघुन गेले. लोक पुन्‍हा भिकुशेटच्‍या
पेढीवर गेले असता भिकुशेटच्‍या शेजारी एक लहान मुलगा बसला होता.
भिकुशेटने त्‍या मुलाला उठायला सांगितले. त्‍या मुलाला दोन्‍ही पाय नव्‍हते. मग भिकुशेटच्‍या नोकराने एका पेटीतून
दोन वस्‍तू काढल्‍या ते कृत्रिम पाय होते ते त्‍या नोकराने त्‍या अपंग मुलाला व्‍यवस्थितपणे बसविले. मुलगा हळूहळू चालू लागला.
भिकुशेट म्‍हणाले,'' भक्तांनो, या मुलाचे नाव विष्‍णु, हा अपंग असून अनाथ आहे. याला पाय नव्‍हते म्‍हणून मी शहरातून हे पाय विकत आणले असून तो आता हिंडू फिरू शकतो. त्‍या विष्‍णुला सोन्‍याचा मुकुटाचा तसा फारसा उपयोग नव्‍हता पण या
विष्‍णुला पायांची गरज होती. मी याला दिलेले कृत्रिम पाय याच्‍या दृष्‍टीने सोन्‍याचांदीपेक्षा जास्‍त महत्‍वाचे आहेत.''
तात्‍पर्य - मानवसेवा हीच खरी ईश्‍वरसेवा

१७ कथेचे नाव :- वक्ता आणि श्रोते
एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्‍वाच्‍या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्‍यांची चुळ‍बुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्‍यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्‍हा श्रोत्‍यांचे आपल्‍या व्‍याख्‍यानाकडे अवधान खेचून आणण्‍यासाठी वक्त्याने एक गोष्‍ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्‍याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्‍ट ऐकू लागले. वक्ता म्‍हणाला,'एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्‍या प्रवासाला निघाले. चालता चालता त्‍यांना वाटेत एक नदी लागली. चि‍मणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्‍यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.'' बस्‍स इतकेच असे सांगून वक्‍त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,'' अहो वक्तेमहाशय, देवाचे पुढे काय झाले, त्‍याने कशी काय नदी पार केली. त्‍या तिघांचे पुढे काय झाले.'' वक्‍त्‍याने शांतपणे उत्तर दिले,''देवच तो; तेव्‍हा ती नदी पार करून जाण्‍याचे सामर्थ्‍य त्‍याच्‍याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्‍यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्‍याला बाजूला सारून जाण्‍याचीही त्‍याच्‍यात होती पण तो अलिकडच्याच तीरावर थांबला.'' श्रोत्‍यांनी मोठ्या उत्‍कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्‍याचे कारण काय. यावर वक्ता म्‍हणाला,'' ज्‍या मूर्खाना महत्‍वाच्‍या विषयावरचे असणारे व्‍याख्‍यान न आवडता मनोरंजक गोष्‍टी आवडतात त्‍या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्‍ही या महत्‍वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्‍यावर काही उपाय केले व आपल्‍या राज्‍याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्‍या तीरावर निघून जाईल'' वक्‍त्‍याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्‍यांनी पुढील व्याख्‍यान शांतपणे ऐकून घेतले.
तात्‍पर्य :- काहीवेळेस आपल्‍या चांगल्या व देशहिताच्‍या योजना लोकांच्‍या गळी उतरविण्‍यासाठी युक्तीप्रयु‍क्तीचा वापर करावाच लागतो.
१८ वेळ
लष्‍करातला एक घोडा रस्‍त्‍याने चालला होता. त्‍याच रस्‍त्‍याने पाठीवरून ओझे घेऊन जाणा-या एका गाढवाला घोड्याने पाहिले व म्‍हणाला,''अरे मूर्ख प्राण्‍या, पटकन बाजूला हो नाहीतर माझ्या पायाखाली फुकट तुडविला जाशील.'' त्‍याचे ते उर्मटपणाचे बोलणे ऐकून ते गाढव निमूटपणे बाजूला झालं पण त्‍या घोड्याचा उमदेपणा व त्‍याचा रूबाब, ऐट पाहून ते गाढव मनातल्‍या मनात म्‍हणालं,''देवा, हा जन्‍म मला ओझे वाहणा-या गाढवाचा दिला आहेस पण पुढचा जन्‍म मात्र मला अशा लष्‍करी, उमद्या जातीच्‍या घोड्याच्याच पोटी घाल मात्र याचा उर्मटपणा मला देऊ नकोस.''
थोड्याच दिवसांनी एका लढाईत तो घोडा जखमी झाला व लढाईच्‍या दृष्‍टीने निकामी झाला तेव्‍हा त्‍याच्‍या सरदार मालकाने त्‍याला एका कुंभाराला विकले. त्‍या घोड्याच्‍या दुर्दैवाने त्‍याचा मालक व त्‍या गाढवाचा मालक एकच होता. दोघांनाही आता कुंभाराचे साहित्‍य घेऊन बाजारात जाणे भाग असे. त्‍या उमद्या पण जखमी घोड्याला आपल्‍यासारखेच ओझे वाहताना, हमाली करताना पाहून आता गाढवाने पुन्‍हा प्रार्थना केली,'' हे देवा, या लष्‍करी घोड्याचा शेवटचा काळ किती कठीण आहे रे,
प्रथम वैभव भोगून हा आता अत्‍यंत कठीण दिवस काढत आहे,
याच्‍या चलतीच्‍या काळात हा उन्‍मत्तपणे वागल्‍यामुळे याच्‍या या परिस्थितीबद्दल कोणालाही याच्‍याबद्दल सहानुभूतीही राहिली नाही.
देवा, असा उद्दाम व उर्मट घोडा बनण्‍यापेक्षा मी आहे तो गाढवच बरा आहे.''
तात्‍पर्य :- तुम्‍ही रसिक वाचक कथेतील मर्म जाणून घ्‍याल अशी अपेक्षा आहे.

१९ सवय
एका माणसाने त्‍याच्‍या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्‍या पोपटाला चांगले खायलाप्‍यायला मिळत असे व पोपट बोलका असल्‍याने घरातील लोकांकडून त्‍याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्‍या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्‍य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्‍या माणसाने पोपटाला खाणे देण्‍यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्‍याच्‍याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्‍याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्‍या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्‍याने त्‍याला फारसे नीट उडताच येत नव्‍हते. एका झाडावर गेला असता त्‍याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्‍याने त्‍याला पोपटांची भाषा येत नव्‍हती म्‍हणून इतर पोपटही त्‍याला सहकारी मानत नव्‍हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्‍याने त्‍याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्‍याने तो आजारी पडला व मरून गेला.
तात्‍पर्य : - जास्‍त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्‍याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्‍कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्‍वातंत्र्य टिकवण्‍यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्‍या संस्‍कृतीचे चांगले काही घेताना आपल्‍या संस्‍कृतीचे विस्‍मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.

२० धनाचा विनियोग 
एकदा एक कोल्‍हा जमिनीत बीळ खणत असताना खूपच खोल खणत गेला. खूप खोल गेल्‍यावर त्‍याला तिथे एक धनाचा हंडा दिसला व त्‍यावर एक वृद्ध नाग त्‍या धनाचे रक्षण करत होता. कोल्‍ह्याने नागाला विचारले,''हे नागदेवता, तुम्‍ही इथे काय करता आहात.'' नाग म्‍हणाला,'' माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्‍या धनाचे मी रक्षण करत आहे.'' मग कोल्‍हा पुन्‍हा म्‍हणाला,'' पण इथं इतकं मोठं धन असताना तुम्‍ही कधी त्‍याचा उपभोग घेतला आहे किंवा नाही. उपभोग सोडा थोडंफार धन दानापोटी तरी खर्च केलंत काय'' नाग म्‍हणाला,'' कसं शक्‍य आहे, हे धन कमी होऊ नये म्‍हणून तर मी स्‍वत: या धनाचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे. त्‍याचा उपभोग घेणे किंवा दुस-याला दान देणे ह्यापेक्षा या धनाचे रक्षण करण्‍यातच मला जास्‍त आनंद आहे.'' हे ऐकून कोल्‍हा नागाला म्‍हणाला,'' मग नागदेवा, तुमच्‍या असल्‍या या श्रीमंतीपेक्षा मी गरीब आहे तोच बरा. ज्‍या धनाचा उपभोग घेतला जात नाही व ज्‍यातून दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग''
तात्‍पर्य - ज्‍या धनाचा योग्‍य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्‍या धनाचा मनुष्‍यमात्राला काहीच फायदा नाही.

२१ परोपकार
एका गावात एक निर्धन मनुष्‍य राहत होता. परिस्थिती गरीबीची असूनही तो मनाने उदार होता. आपल्‍या घासातील घास देण्‍यासही तो कमी पडत नसे. एकदा एका शेठजीकडे तो जेवावयास गेला असताना त्‍या शेठजीने त्‍याला पंचपक्‍वान्‍नाचे ताट वाढून दिले. ती भरगच्‍च पदार्थांनी भरलेली थाळी बघून त्‍या गरीबाला वाटले की यातून किमान तीन माणसांची भूक भागू शकेल. त्‍याने शेठजीची परवानगी मागितली व त्‍यातील अन्‍न त्‍याने बरोबर घेतले व घराकडे जाण्‍यास निघाला. रस्‍त्‍यात त्‍याला एक भिकारी भेटला त्‍याला त्‍याने खायला दिले. त्‍यातून उरलेले अन्‍न घेऊन तो घरी आला, तो जेवायला बसणार इतक्‍यात एक भिक्षुक या माणसाच्‍या घरी आला व त्‍याने त्‍याला अन्‍नदान करण्‍याची विनंती केली. गरीबाने त्‍याच्‍यासमोरील ताट त्‍या भिक्षुकाच्‍या स्‍वाधीन केले. त्‍यानंतर अजून एक अपंग व्‍यक्ती दाराशी आली त्‍यानेही या गरीबाकडे अन्न मागितले त्‍यालाही याने आपल्‍या थाळीतील अन्न खायला दिले. आता याच्‍याकडे देण्‍यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही तेव्‍हा याने स्‍वत:ची भूक भागविण्‍यासाठी एक भांडेभर पाणी घेतले तर समोरून एक वृद्ध व्‍यक्ती आली व तिने ते पाणी पिण्‍यासाठी मागितले. याला आता खाण्‍यापिण्‍यासारखे काहीच उरले नाही तरीही ही व्‍यक्ती समाधानात होती आजचा दिवस आपल्‍यामुळे किमान चार लोकांना तरी खाण्‍यापिण्‍यास मिळाले. तो ह्याच विचारात असताना तेथे देव प्रगटले व म्‍हणाले,'मी तुझी परीक्षा घेण्‍यासाठीच भिकारी, भिक्षुक, अपंग आणि वृद्ध व्यक्तिचे रूप घेतले होते व तुझ्याकडून काही ना काही मिळते का नाही हे पाहिले आणि तु स्‍वत:चा विचार न करता दुस-याचा जीव जाणून घेतलास व देत राहिलास. आता या पुढे तुला काहीच कमी पडणार नाही असा मी तुला वर देतो.'' इतके बोलून देव अंतर्धान पावले.
तात्‍पर्य - देण्‍यातच खरे सुख लपलेले आहे. कुणाचाही घास हिरावून घेण्‍यापेक्षा कुणाला तरी एखादा घास देता कसा येईल याचा विचार करणे यातच खरे सुख लपलेले आहे.

२२ कथेचे नाव :- दृष्‍टीकोन बदला
एक झाड सुंदर फळाफुलांनी बहरून गेले होते. सुंदरता आणि संपन्‍नतेमुळे पक्षी अधिक प्रमाणात त्‍या झाडावर राहत होते. झाडही आनंदाने आश्रय आणि भोजन देत होते. तसेच वाटसरूंना सावली देण्‍याचे कार्यही झाड प्रामाणिकपणे करत होते त्‍यामुळे वाटसरूंचे आशीर्वाद झाडाला मिळत असत. त्‍यामुळे झाडाजवळ सदैव प्रसन्‍नता असायची मात्र कालांतराने झाडाला या गोष्‍टीचा गर्व झाला आणि माझ्यासारखे दुसरे झाडच नाही, सगळ्या झाडात मीच श्रेष्‍ठ आहे असा भ्रम त्‍याला झाला. काही काळाने झाडाला फळे फुले येण्‍याचे बंद झाले, पानांची गळती सुरु झाली. सावली नसल्‍याने वाटसरू येईनात, फळे नसल्‍याने पक्षी राहिनात अशी अवस्‍था झाली. झाडाला वाईट वाटले त्‍याने तेथून जाणा-या एका सिद्धपुरुषाला विचारले की माझ्या आयुष्‍यभर मी सर्वांची सेवा केली पण माझ्या या वृद्धापकाळी माझी कोणी साधी विचारपूस सुद्धा का करीत नाहीत. काही लोक तर मला तोडण्‍याची भाषा करत आहेत. सिद्धपुरुष म्‍हणाले, अरे वृक्षराजा, तू विचार करण्‍याची पद्धत बदल, जीवनभर लोकांच्‍या कल्‍याणसाठी राबणारा हा तुझा डोलारा आता तुझ्या मृत्‍युनंतरही उपयोगी पडणार आहे. तुझ्या लाकडाचे अनेक उपयोग माणसाच्‍या कल्‍याणासाठी होणार आहेत. मरूनही तू चिरंतन माणसाच्‍या स्‍मरणात राहणार आहेस. तेव्‍हा तू तुझ्या मरणाकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन बदल. हे ऐकून वृक्षाला आनंद वाटला व त्‍याने दु:ख न मानण्‍याचे ठरवले.
तात्‍पर्य : कोणत्‍याही गोष्‍टीकडे सकारात्‍मक दृष्‍टीने पाहिल्‍यास त्‍यातील चांगल्‍या बाबी लक्षात येतात. मात्र नकारात्‍मक विचारसरणीने नुकसान होण्‍याचीही शक्‍यता असते.

२३ लोभापायी नुकसान
कोणे एके काळी बलवंतपूर हे चतुरसेन पहिलवानासाठी फार प्रसिद्ध शहर होते. चतुरसेन पहिलवान हा अत्‍यंत चतुर असल्‍याने त्‍याचे नाव चतुरसेन पडले होते. त्‍याच्‍या ताकदीचे व चातुर्याचे किस्‍से पंचक्रोशीत प्रसिद्ध होते त्‍यामुळे त्‍याच्‍या फारसे कोणी वाटेला जात नसे. एकेदिवशी दुस-या राज्‍यातुन रामशरण नावाचा एक पहिलवान त्‍या गावातून जात होता. गावात त्‍याने चतुरसेनची कीर्ति ऐकली. गावक-यांनी त्‍याला कुस्‍ती लढण्‍याचा आग्रह केला. दोघांमधील विजेत्‍यास हजार रुपयांच्‍या इनामाची घोषणा केली. कुस्‍तीस आरंभ झाला आणि पहिल्‍यापासूनच रामशरणने आघाडी घेतली. आपण लवकरच हरणार आहोत हे समजायला चतुरसेनला फारसा वेळ लागला नाही व त्‍याने पटकन रामशरणच्‍या कानात सांगितले की मित्रा जर तु जिंकलास तर तुला हजार रूपये मिळतील पण तू जर हरला तर मी तुला गुपचुपपणे दोन हजार रूपये देईन. यामुळे माझी गावातील इज्जतही टिकून राहिल आणि तुलाही दुप्पट पैसे मिळतील. रामशरणने सहजपणे चतुरसेनाच्‍या चतुर बोलण्‍याचा बळी ठरला व पैशांच्‍या
लोभाने त्‍याच्‍यावर विश्‍वास ठेवून कुस्‍ती हारला. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाल्‍यावर सर्व निघून गेले व चतुरसेनाकडे रामशरण गेला व म्‍हणाला, मित्रा तुझ्या म्‍हणण्‍याप्रमाणे मी कुस्‍ती हरलो आता माझे पैसे दे. यावर चतुरसेन म्‍हणाला, कसले पैसेबिसे घेऊन बसलास, कुस्‍तीत शारीरिक डावपेच तर लढवले जातात पण हा मानसिक डावपेच तुला माहित नव्‍हता यात रूपयापैशांचा विचार कुठे आला. तु लोभामुळे हरला आहेस जा तुझ्या गावाला.
तात्‍पर्य : लोभापायी सर्वस्‍वाची हानी होऊ शकते तेव्‍हा लोभापासून दूर असलेले बरे.

२४ वाईट सवयींचा त्‍याग
एक व्‍यापारी होता. तो जितका व्‍यवहारी, विनम्र आणि मनमिळाऊ होता तितकाच त्‍याचा मुलगा उद्धट आणि गर्विष्‍ठ होता. त्‍याला सुधारण्‍याचे अनेक प्रयत्‍न निष्‍फळ ठरले. एकदा ही गोष्‍ट त्‍याने एका मित्राला सांगितली. मित्र म्‍हणाला, त्‍याला माझ्याकडे काही दिवस राहण्‍यासाठी पाठवून दे. मी तुझ्या मुलाला ठिकाणावर आणून दाखवेन. त्‍या व्‍यापा-याचा मुलगा मित्राच्‍या घरी राहण्‍यास गेला. त्‍याच्‍या वडिलांच्‍या मित्रांनी त्‍याला अतिशय चांगली वागणूकदिली. एकदा ते त्‍याला बागेत फिरावयास घेऊन गेला असता, एक फूट उंचीचे रोप त्‍याला उपटण्‍यास सांगितले. मुलाने ते रोप सहजच उपटले, त्‍यानंतर त्‍याने मुलाला सहा फूट उंचीचे रोप उपटण्‍यास सांगितले, मुलाला ते उपटण्‍यास खूप ताकद लावावी लागली. शेवटी ते एका उंच वृक्षाजवळ आले व मित्रांनी मुलाला तो वृक्ष उपटून टाकण्‍यास सांगितला. मुलाने ते शक्‍य नसल्‍याचे सांगितले. त्‍यावेळी मित्रांनी मुलाला उपदेश केला तो म्‍हणजे असा की,' आपण एखादे वाईट कामाला सुरुवात करत असतो तेव्‍हा त्‍यापासून दूर जाणे शक्‍य असते पण मात्र त्‍या कामात जर आपण खोलवर गुंतून गेलो की आपल्‍याला त्‍यापासून सुटका करणे अशक्‍य असते. वाईट सवयी किंवा वाईट वर्तनाचे सुद्धा असेच आहे, जोपर्यंत सहज शक्‍य आहे तोपर्यंत वाईट वर्तन किंवा सवय सोडलेली चांगली असते.'' मुलाला त्‍याच्‍या मित्रकाकांचा उपदेश सहजपणे
लक्षात आला व त्‍याने चांगले वागण्‍याचे ठरवले.

२५ गर्वहरण
नदीच्‍या काठावर एक नारळाचे झाड होते. या झाडावर लागलेल्‍या नारळांना एक प्रकारचा गर्व चढला होता. तो नेहमी येणा-या जाणा-या वस्‍तूंना चिडवायचा पण त्‍याचा स्‍वभाव सगळेजण ओळखून होते. त्‍यामुळे त्‍यालाच कोणीच प्रत्‍युतर देत नसत. नदीमध्‍ये पडलेल्‍या दगडांचा तर नारळ खूप अपमान करीत असे. एकदिवशी तो नदीतल्‍या दगडाला म्‍हणाला,'' तुझी किती केविलवाणी परिस्थिती आहे, पहा! इथेच पडल्‍या पडल्‍या झिजून झिजून जाशील पण नदीचे पाय काही तू सोडणार नाहीस. ही नदी तुला देते तरी काय रे, अपमानालाही काही परिसीमा असते की नाही, मला पहा कशा प्रकारे उंच जागेवर आणि उच्च पदावर बसविले आहे.'' दगडाने त्‍याची बडबड ऐकून घेतली पण तो काही बोलला नाही. दोघेही आपापल्‍या स्‍थानी निघून गेले नारळ आता पूजेच्‍या थाळीत गेला होता. मंदिरात गेल्‍यावर नारळाने पाहिले की नदीतला दगड आता पूजास्‍थानी पोहोचला होता व शाळीग्राम म्‍हणून लोक त्‍याला पूजत होते. नारळाचा खूप संताप झाला की एका य:कश्चित दगडाच्‍या पूजेसाठी आपल्‍याला आणले गेले आहे पण तो काहीच करू शकत नव्‍हता. दगडाने त्‍याची मनस्थिती ओळखली व म्‍हणाला,'' नारळा, पहा झिजल्‍याचा कोणता परिणाम होतो. तेव्‍हा कधीच गर्व बाळगू नकोस.''
तात्‍पर्य : वेळ सारखी राहत नसते. गर्वाने वागणा-यांवरही कधी ना कधी मान खाली घालण्‍याची परिस्थिती येऊ शकते.

२६ सुसंवाद
एका शहरात एक दांपत्‍य राहत होते. पतीचा मोठा व्‍यवसाय होता. गावात पतीला चांगली प्रतिष्‍ठा होती. कामाच्‍या व्‍यापात तो दिवसभर व्‍यग्र राहत असे. आपल्‍या व्‍यग्र जीवनशैलीमुळे तो पत्‍नीला वेळ देऊ शकत नसे यामुळे पत्‍नी एकाकी पडत चालली होती. एकाकीपणाने ती कायमच अस्‍वस्‍थ राहायची, आपल्‍या मनातील गोष्‍टी ती कोणाला सांगूही शकत नव्‍हती. पतीला काही सांगायला जावे, तर तो उद्या ऐकू, परवा ऐकू असे सांगून तिच्‍यासमोरून निघून जायचा. एकेदिवशी दोघांत मोठे भांडण झाले. पती चिडून म्‍हणाला, '' तू तर माझ्या व्‍यवसायात मला काडीचीही मदत करत नाहीस, त्‍यामुळे मी माझ्या मुलाला वकीलच बनविणार आहे. तो निदान मला कोर्टाच्‍या कामात तरी मदत करेल.'' त्‍याचे हे बोलणे ऐकताच बायको भडकली आणि म्‍हणाली,'' तुम्‍हाला तर स्‍वत:चेच पडले आहे, माझ्याकडे लक्ष द्यायला कुठे तुम्‍हाला वेळ आहे. मी माझ्या मुलाला डॉक्‍टरच बनविणार आहे. जेणेकरून मी आजारी पडल्‍यावर तरी तो माझी काळजी घेईल.'' दोघेही आपल्‍या मुलाला काय बनवायचे यावरून जोरजोरात भांडू लागले, एकमेकांची उणीदुणी काढू लागले, भांडणाचा शेवट अगदी हातापायीपर्यत येऊन पोहोचल्‍यावर आजूबाजूचे लोक जमा झाले व त्‍यांच्‍यातील एका सज्जन माणसाने मध्‍यस्‍थ म्‍हणून तेथे प्रवेश केला व म्‍हणाला,'' अहो तुमचे दोघांचेही ठीक आहे, पण मुलाचा कोणत्‍या शाखेकडे कल आहे ते तरी बघा. त्‍याला काय व्‍हायचे ते त्‍याला ठरवू द्या ना. तुम्‍ही काय उगीच ठरवून त्‍याच्‍यावर तुमची मते लादत आहात.'' हे बोलणे ऐकताच नवराबायको एकदम गप्‍पच झाले. कारण त्‍यांना अजून मुलबाळ काहीच नव्‍हते आणि भविष्‍यात होणा-या मुलाच्‍या भवितव्‍याविषयी ते भांडत बसले होते. लोकांना ही गोष्‍ट कळताच त्‍यांनी त्‍या दोघांना अक्षरश वेड्यात काढले व आपला वेळ फुकट गेला म्‍हणून निघून गेले.
तात्‍पर्य - व्‍यर्थ गोष्‍टींवर वाद घालून कोणतीही गोष्‍ट साध्‍य होत नाही./ भविष्‍यातील गोष्‍टींची चिंता करण्‍यापेक्षा वर्तमानातील गोष्‍टींचा विचार करणे चांगले असते.

२६ इंद्रियांवर ताबा
एक महात्‍मा रस्‍त्‍यातून घरी चालले होते. वाटेत त्‍यांना एक लिंबू विक्रेता दिसला. लिंबे रसाळ आणि ताजी होती. महात्‍म्‍याच्‍या तोंडाला पाणी सुटले. लिंबे खरेदी केली पाहिजेत असे त्‍यांना वाटले. त्‍यांनी लिंबाना निरखून पाहिले, ती स्‍वादिष्‍ट आहेत काय याचीही चौकशी केली पण जिभेच्‍या या चोचल्‍याचा मनाने धिक्‍कार केला. लिंबू पाहून तोंडाला पाणी सुटणे हा एक प्रकारचा लोभ आहे आणि तो साधनेच्‍या कार्यात अडथळा निर्माण करतो. महात्‍मा पुढे गेले परंतु त्‍यांचा जिभेचा शौक हार मानत नव्‍हता. त्‍यांची जीभ लिंबांचा स्‍वाद घेण्‍यासाठी आसुसली होती. ते परत लिंबूवाल्‍याकडे आले. त्‍याच्‍याकडील लिंबे निरखून पा‍हू लागले. परत एकदा मनाने धिक्‍कार केला आणि हातातील लिंबू खाली टाकून महात्‍मा परतले. चार पावले पुढे गेल्‍यावर परत एकदा त्‍यांच्‍या मनाने उचल खाल्‍ली आणि ते परत लिंबूवाल्‍याकडे आले. लिंबूवाला त्‍यांचे हेलपाटे पाहून आश्‍चर्यचकित झाला. त्‍याला हे कळेना की हे महात्‍मा सारखे का हेलपाटे मारत आहेत. यांना खरेच लिंबू खरेदी करायचे आहे की नुसतेच पाहत आहेत. शेवटी न राहवून त्‍याने विचारले,''महाराज, तुम्‍हाला जर लिंबे खरेदी करायची असतील तर अवश्‍य करा ना पण नुसतेच हेलपाटे का मारत आहात.'' शेवटी महात्‍म्‍यांनी दोन लिंबे खरेदी केली आणि घरी आले. घरी येताच त्‍यांनी पत्‍नीला चाकू मागितला. लिंबांचे दोन तुकडे केले. जसा पहिला लिंबाचा तुकडा तोंडाजवळ आणला तसा मनाने टोमणा मारला,''वा रे वा महात्‍माजी, तू तर या जिभेचा गुलाम झाला. जीभ जशी नाचवेल तसा तू नाचायला लागला. ती जे खायला मागेल तसा तू तिला खायला द्यायला लागला. आता तुझी साधना ही विषयांकडे चालली आहे.'' तितक्‍यात त्‍यांची पत्‍नी तिथे आली व तिने पतीचा तोंडाजवळ थबकलेला हात पाहून विचारले,''अहो, लिंबाचा स्‍वाद घेता घेता का थांबलात.'' महात्‍म्‍यांनी ते कापलेले लिंबू आणि उरलेले अर्धे लिंबू दोन्‍हीही पत्‍नीच्‍या हातात देऊन तिला सांगितले,'' मी आता हे खाणार नाही कारण आता मी जीभेवर विजय मिळवला आहे. आता मला विश्‍वास पटला आहे की मी इंद्रियावर ताबा ठेवू शकतो.''
तात्‍पर्य – इंद्रियांवर ताबा ठेवता येणे ही फार मोठी साधना आहे.

२७ एक हाताची टाळी
वनातील आश्रमात एक संत राहत होता. त्‍यांच्‍यासोबत एक अनाथ मुलगाही राहत होता. संतांना पाहून त्‍या मुलालाही ध्‍यानसाधना शिकण्‍याची इच्‍छा झाली. तो संतांजवळ जाऊन म्‍हणाला,''गुरुजी मला ध्‍यानसाधना शिकायची आहे.'' संतांनी त्‍याला समजावले की तुझे वय हे ध्‍यानसाधना करायचे नाही. आता तू भक्ती शिक. पण मुलगा आपल्‍या जिद्दीवर अडून राहिला. त्‍याचा हट्ट पाहून संतांनी दोन्‍ही हातांनी मिळून एक जोरात टाळी वाजवली आणि मुलाला म्‍हणाले,'' हा दोन हातांच्‍या टाळीचा आवाज आहे. आता तू बाहेर जा आणि एका हाताच्‍या टाळीचा शोध घे.'' मुलाने विचार केला की, एका हाताची टाळी म्‍हणजेच ध्‍यानसाधना असेल तेव्‍हा तो आवाज अत्‍यंत मधूर व अद्भूत असेल. मुलगा रात्रंदिवस एका हाताच्‍या टाळीचा आवाज शोधू लागला. एके दिवशी मुलगा जंगलात एकेठिकाणी बसला होता, तेथे मंद हवेमध्‍ये झाडांची पाने हलताना एकमेकांवर घासत होती. मुलाला वाटले की पानांच्‍या ह्या आवाजात दिव्‍य प्रकारची शांती आहे. हाच एका हाताच्‍या टाळीचा आवाज आहे. तो मुलगा पळतच संतांकडे गेला आणि संतांना या आवाजाची माहिती दिली. संत म्‍हणाले,'' हा तर पानांचा आवाज आहे. एका टाळीचा आवाज नाही. आणखी शोध घे.'' मुलाचा शोध सुरुच राहिला. प्रत्‍येक वेळी मुलगा संतांना काहीतरी सांगायचा व प्रत्‍येक वेळी संत नकार देत गेले आणि मुलाला आणखी शोध घे असे सांगितले. मुलगा आता अठरा वर्षाचा झाला होता. एक दिवस तो गुरुजींकडे जाऊन बसला आणि डोळे बंद करून गहि-या मौनामध्‍ये डुंबला. जणूकाही त्‍याची समाधीच लागली होती. गुरुजी काहीच बोलले नाहीत. गुरुजींनी मंदस्मित केले आणि शांत राहिले कारण त्‍यांच्‍या शिष्‍याला आता कुठे एका हाताच्‍या टाळीचा आवाज ऐकू येऊ लागला होता.
तात्‍पर्य – ध्‍यान मनाच्‍या एकाग्रतेवर अवलंबून आहे आणि मनाची एकाग्रता, योग्‍य गुरुचे मार्गदर्शन यामुळे आपण आतूनबाहेरून पूर्णपणे बदलून जातो.

२८ जीवनाचे सार
एक विलासी बादशहा होता. तो सर्व प्रकारची व्‍यसने करीत असे आणि आपल्‍याबरोबरच तो प्रधानालाही म्‍हणायचा,'' मनुष्‍य जन्‍म पुन्‍हा पुन्‍हा मिळत नाही, त्‍यामुळे आता जो जन्‍म मिळाला आहे त्‍याचा उपयोग करा आणि सर्व प्रकारचे उपभोग करून घ्‍या.'' प्रधान हा सन्‍मार्गी माणूस होता. त्‍याला बादशहाच्‍या उपभोगी, चैनी आणि विलासी वृत्तीचे दु:ख व्‍हायचे पण वारंवार समजावूनही बादशहाचे वागणे काही बदलत नव्‍हते. बादशहा आपल्‍या मौजमजेच्‍या इतका आहारी गेला होता की त्‍याला आपल्‍या प्रजेची आठवण नसायची. प्रजेमध्‍ये बादशहाबाबत असंतोष होता मात्र बादशहा फारच कठोर व निर्दयी असल्‍याने कोणीही काही करू शकत नव्‍हते. एकेदिवशी प्रधानाने केलेल्‍या काही कामामुळे बादशहा फारच खुश झाला. त्‍याने दरबारामध्‍ये प्रधानाचा सत्‍कार केला व त्‍याला एक अत्‍यंत भरजरी व मौल्‍यवान अशी शाल भेट म्‍हणून दिली. पण प्रधानाने दरबाराच्‍या बाहेर येताच त्‍या भरजरी शालीला आपले नाक पुसले ही गोष्‍ट नेमकी प्रधानाच्‍या विरोधात असलेल्‍या एकाने राजाला जाऊन सांगितली. बादशहाला राग आला, त्‍याने प्रधानाला बोलावून एवढ्या मौल्‍यवान वस्‍तूचा अनादर करण्‍याचे कारण विचारले असता प्रधान म्‍हणाला,'' बादशहा, मी तेच करत आहे जे तुम्‍ही मला शिकवत आला आहात.'' बादशहा विचारात पडला की आपण असे काय शिकवले. प्रधान परत बोलू लागला,''महाराज, देवाने आपल्‍याला या शालीपेक्षा मौल्‍यवान असे शरीर दिले आहे पण आपण त्‍याचा गैरवापर करत आहात. व्‍यसने, भोग यामुळे या शरीराचा सन्‍मान न होता मोठा अपमानच आपण करत आला आहात. तो जेव्‍हा आपणाकडे पाहत असेल तेव्‍हा परमेश्‍वराला किती वाईट वाटत असेल की इतक्‍या मौल्‍यवान शरीराला आपण कशाप्रकारे वापरून त्‍याची घाण करत आहात. परमेश्‍वराचा प्रत्‍येक हृदयात वास असतो आणि त्‍याच शरीराला तुम्‍ही वाईट मार्गाने वापरत आहात.'' प्रधानाचे हे बोलणे ऐकताच राजाचे डोळे खाडकन उघडले. त्‍याने प्रधानाची क्षमा मागितली व पुन्‍हा कधीही त्‍याने गैरवर्तन केले नाही.
तात्‍पर्य – ईश्‍वराने दिलेल्‍या शरीरसंपदेचा योग्‍य मार्गाने वापर केला पाहिजे. मानवाला बुद्धी, विवेक आणि ज्ञान याचे वरदान ईश्‍वराकडून मिळाले आहे. त्‍याचा योग्‍य उपयोग करून तो आपले जीवन सार्थकी लावू शकतो.

२९ मन:शांतीचे रहस्‍य
एका गावात एक महात्‍मा राहत होते. ते अत्‍यंत शांत आणि संयमी स्‍वभावाचे म्‍हणून ओळखले जात. त्‍यांना कोणत्‍याही गोष्‍टीचा कधीच राग येत नसे. कुणी त्‍यांच्‍याशी कधी उद्धटपणे बोलला किंवा गैर वागला तरी त्‍यांच्‍या कपाळावर कधीच आठी उमटत नसे. ते सदैव हसतमुख व आनंदी राहत असत. ज्‍या लोकांना त्‍यांचे हे वागणे आवडत नसे ते लोक त्‍यांना जाणूनबुजून त्रास देण्‍याचा प्रयत्‍न करत असत. परंतु महात्‍म्‍याच्‍या तोंडून कधीही एखादा वेडावाकडा उदगार देखील बाहेर पडत नसे कि चेह-यावरही कधी त्रासिक भाव उमटत असे. अनेक लोकांनी जंग जंग पछाडले तरी महात्‍म्‍याला राग काही आलेला कुणीच पाहिला नव्‍हता शेवटी त्‍यांच्‍या या संयमशीलतेचे रहस्‍य काय असावे हे विचारण्‍यासाठी काही लोक महात्‍म्‍याकडे गेले. त्‍यांच्‍यातील एकाने विचारले,''महाराज, तुम्‍ही कधीच रागवत नाही, चिडत नाही, शांत कसे काय राहू शकता. तुमच्‍यात इतकी सहनशक्ती कोठून आली आहे.'' महात्‍म्‍यांनी उत्तर दिले,''मित्रांनो, ज्‍यांचे उद्दिष्‍ट अत्‍यंत उच्‍च पातळीवर जायचे असते त्‍यांना खालच्‍या पातळीवर जायची कधीच गरज पडत नाही. मी खालच्‍या पातळीवर कधीच उतरायला तयार नसतो. मला असे वाटते की, माझ्याबद्दल लोकांना काय वाटायचे ते वाटू दे पण आपले मन विरोधी विचारांनी कलुषित करून घ्‍यायचे नाही. मी जेव्‍हा जमिनीकडे नजर टाकतो तेव्‍हा क्षमाशीलतेचे मोठे प्रतिक दिसून येते. लोकांनी किती त्रास दिला जमिन क्षमा करते. आपल्‍या गरजा किती मर्यादित आहेत हे भान जर प्रत्‍येकाने ठेवले तर प्रत्‍येकजण माझ्याइतका शांत होऊ शकतो. ज्‍यांच्‍या मनात करूणा आणि सगळयांना सारखे लेखण्‍याची भावना असते तो निर्विकार वृत्तीनेच राहतो.''

३० दुस-याबाबतचा दृष्‍टीकोन
स्‍टार्मवेल नावाचे एक इंग्रज पत्रकार होते. ते एखाद्याची मुलाखत घेणार असतील तर त्‍यांच्‍या खासगी आयुष्‍यातील गोष्‍टी ते उघडपणे बोलून दाखवत असत. एकदा स्‍टार्मवेल यांना श्रीकृष्‍ण मेनन यांची मुलाखत घ्‍यावयाची होती. स्‍टार्मवेल यांनी आक्रमकपणे पहिलाच प्रश्‍न मेनन यांना विचारला,'' मिस्‍टर मेनन, तुम्‍ही अत्‍यंत गरीबीतून वर आलेला आहात. तुम्‍ही शाळेत वॉच स्‍काऊट म्‍हणून काम करत होता. एका इंग्रज महिलेने तुम्‍हाला आधार दिला व त्‍यांनीच तुम्‍हाला लंडनला पाठविले. तेथे कायदा आणि अर्थशास्‍त्राचे शिक्षण घेऊन तुम्‍ही भारतात परत आला. येथे पुन्‍हा तुम्‍हाला संघर्ष करावा लागला. त्‍याचवेळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे तुमच्‍याकडे लक्ष गेले. त्‍यांनी तुम्‍हाला योग्‍य संधी दिली. आज तुम्‍ही त्‍यांच्‍या जवळचे आहात. नेहरूंच्‍या मंत्रिमंडळात तुमची वर्णी लागणार आहे असे बोलले जात आहे. म्‍हणजेच तुम्‍ही तळातून उठून आकाशात जाऊन ठेपणार आहात. पण मिस्‍टर मेनन तुम्‍ही मला खरेच सांगा की, तुम्‍ही कम्‍युनिस्‍ट आहात हे खरे आहे का.'' मेनन यांनी शांतपणे पण ठाम स्‍वरात म्‍हणाले,'' तुम्‍ही माझे जे कौतुक केले त्‍याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मलाही तुमचे कौतुक करावेसे वाटते ते म्‍हणजे तुम्‍ही रस्‍तोरस्‍ती पेपर विकून तुमचे पोट भरत होता. तेथूनच तुम्‍ही मोठे झालात, आता तुम्‍हाला चांगला पगार मिळतो आहे. पण मलाही तुम्‍हाला एक प्रश्‍न विचारायला आवडेल की, खरेच सांगा की तुम्‍ही एक अनौरस संतान आहात काय.'' मेनन यांच्‍या सडेतोडपणामुळे स्‍टार्मवेल यांची बोबडी वळाली आणि त्‍यांनी तो विषय टाळून दुस-या प्रश्‍नाकडे वळाले.
तात्‍पर्य – दुस-याच्‍या खाजगी आयुष्‍यात डोकावताना त्‍याला दु:ख देणा-या गोष्‍टींबाबत चर्चा न केलेली बरी असते. कारण प्रत्‍येकाच्‍याच आयुष्‍यात काही ना काही गोष्‍टी या अतिखासगी या प्रकारात मोडतात त्‍यामुळे दुस-याच्‍या आयुष्‍यात ढवळाढवळ न केलेलीच चांगली.

३१ बदलण्‍याची संधी
सरधोगा जिल्‍ह्यातील खुशाबनगर येथे दिवाण मदनगोपाल राहत असत. अनेक राजवाड्यांचे मालक असलेल्‍या मदनगोपाल यांना दारूचा मोठा शौक होता. विलायती दारूच्‍या अनेक पेट्या त्‍यांच्‍या घरी त्‍यांनी साठवून ठेवलेल्‍या होत्‍या. मदनगोपाल एकदा सुगंधित थंड खोलीत विश्रांती घेत पहुडले होते. रखरखत्‍या उन्‍हात एका तेजस्‍वी साधूने त्‍यांच्‍या खोलीत प्रवेश केला. दिवाणसाहेबांनी हात जोडून त्‍या साधूला स्‍थान ग्रहण करण्‍यास सांगितले. साधू महाराज म्‍हणाले,''दिवाणसाहेब, मी इथे आलो आहे ते तुमच्‍याकडून एक वचन घेण्‍यासाठी, बोला मला वचन देताल काय'' दिवाणजी म्‍हणाले,''तुम्‍ही जे मागताल ते जर माझ्याकडे उपलब्‍ध असेल तर निश्चित वचन देण्‍यास मी बांधिल असेन. साधू म्‍हणाले,'' तुमची सर्वात प्रिय वस्‍तू म्‍हणजे दारू तुम्‍ही सोडून द्याल एवढेच वचन मला द्या.'' मदनगोपाल पहिल्‍यांदा कचरले पण वचन पूर्ण करण्‍यासाठी ते तयार झाले. त्‍यांनी नोकरांना बोलावले व दारूच्‍या सगळया बाटल्‍या फोडून टाकायचा आदेश दिला. नोकरांनी साधूच्‍यादेखतच सर्व बाटल्‍या फोडून टाकल्‍या. साधूला आनंद वाटला, त्‍यांनी परत जाताना दिवाणसाहेबांकडून पुन्‍हा कधीही दारू पिणार नाही असे वचन घेतले व निघून गेले. साधू गेल्‍यावर एक नोकर दिवाणजीकडे आला व म्‍हणाला,''महाराज आजच्‍या रात्रीपुरती दारू मी एकेठिकाणी लपवून ठेवली आहे, आणू का'' दिवाणजींनी त्‍याला ती बाटली आणावयास सांगून नोकराने ती बाटली आणताच त्‍यांनी ती बाटलीही स्‍वत:च्‍या हाताने फोडली व आयुष्‍यात पुन्‍हा कधीच दारूला स्‍पर्श केला नाही. पुढे वृंदावनला जाऊन त्‍यांनी दीक्षा घेतली. मदनगोपाल यांच्‍या आयुष्‍याची दिशाच त्‍या एका प्रसंगामुळे बदलून गेली. पुढे श्रीकृष्‍णप्रेमात बुडालेल्‍या मदनगोपाल यांनी ''निमाईचंद'' हे उत्‍कृष्‍ट उर्दू पुस्‍तक लिहीले.
तात्‍पर्य – स्‍वत:ला बदलण्‍याची संधी मिळाल्‍यावर प्रत्‍येकाने त्‍याचा लाभ घेतला पाहिजे. कदाचित त्‍या संधीतूनच आपल्‍या आयुष्‍याला कलाटणी मिळून आयुष्‍याचे सोने घडू शकते.

३२ श्रमाचे मोल
गुर्जर नरेश सम्राट कुमार पटलचे गुरु आचार्य हेमचंद्र यात्रेहून राजधानीचे शहर पाटणकडे चालले होते. वाटेत त्‍यांनी एका गावात रात्रीचा मुक्काम केला. ते‍थे एका गरीब विधवा महिलेच्‍या घरी ते राहिले होते. त्‍या महिलेने श्रद्धापूर्वक आचार्यांचे आदरातिथ्‍य केले. तिच्‍याकडून शक्‍य तितके चांगले जेवण दिले. ते मोडकेतोडके घर आचार्यांना महालाप्रमाणे भासले. दुस-या दिवशी जेव्‍हा आचार्य मार्गस्‍थ झाले. तेव्‍हा त्‍या महिलेने आचार्यांना स्‍वत:च्‍या हाताने कातलेल्‍या सुताची रजई भेट दिली. आचार्यानी ती रजई पांघरूनच नगरात प्रवेश केला. सम्राट कुमार पटल यांनी गुरुंचे स्‍वागत केले, परंतु त्‍यांच्‍या अंगावरील सुताची रजई पाहून त्‍यांना वाईटही वाटले. सम्राट म्‍हणाले,''गुरुवर्य, ही जाडीभरडी रजई एखाद्या सम्राटाच्‍या गुरुच्‍या अंगावर शोभून दिसत नाही. तुम्‍हाला खरेतर सुख आणि शोभा यांची गरज नाही पण माझ्या गुरुच्‍या अंगावर मौल्‍यवान उत्तरीय असण्‍याऐवजी हे जाडेभरडे वस्‍त्र कसेतरीच दिसते.'' आचार्य हेमचंद्र यांना सम्राटाचा अहंकार त्‍याच्‍या बोलण्‍यात दिसून आला. आचार्य म्‍हणाले,'' राजा, या रजईमागे अनेक लोकांचे परिश्रम जोडले गेले आहेत. मला त्‍या परिश्रमांची ऊब हवी आहे. परिश्रम हा खरेतर आपला अभिमान असायला हवा आहे. शिवाय त्‍या गरीब भगिनीने ज्‍या प्रेमाने ही रजई मला भेट दिली आहे ती भेट मला तुमच्‍या मौल्‍यवान उत्तरीयापेक्षाही जास्‍त किंमती वाटते.'' आचार्यांच्‍या उत्तराने सम्राटाचा अहंकार गळून पडला व त्‍याने आचार्यांची माफी मागितली.
तात्‍पर्य – परिश्रमातून साकार झालेली कोणतीही गोष्‍ट अतिशय मौल्‍यवान असते.

३३ माणुसकी
संस्‍कृतचे महा‍कवी माघ निर्धन असले तरी मदत करण्‍यास कधीच कमी पडत नसत. त्‍यांच्‍याकडून जितकी मदत गरजूला होत असे तितकी मदत करण्‍यास सदैव तयार असत. एकदा क‍वीराज माघ आपल्‍या घरी शिशुपाल वध या महाकाव्‍याचा नववा अध्‍याय लिहीत असताना दरवाजावर कोणाची तरी हाक ऐकू आली. कोणी हाक मारली हे पाहण्‍यासाठी ते गेले असता त्‍यांना दारावर त्‍यांच्‍याच गावातील एक गरीब व्‍यक्ती उभारलेली दिसली. त्‍यांनी त्‍या माणसाला आदराने घरात बोलावले. त्‍याचे योग्‍य ते आदरातिथ्‍य केले व येण्‍याचे प्रयोजन विचारले असता तो गरीब माणूस म्‍हणाला,'' कविराज मी मोठी आशा ठेवून आपल्‍याकडे आलो आहे. माझ्या मुलीचा विवाह ठरला असून त्‍यासाठी मला धनाची गरज आहे. माझी परिस्थिती तर आपण जाणून आहातच. तरी आपल्‍याकडून मला जी मदत होईल ती माझ्यादृष्‍टीने खूप मोठी असणार आहे.'' महाकवींकडेही आर्थिक चणचण होती. परंतु दारी मदत मागायला आलेल्‍या माणसाला परत पाठविणे त्‍यांना योग्‍य वाटेना. घरात सगळीकडे शोध घेतला पण त्‍यांना त्‍या माणसाला देण्‍याजोगे काहीच मिळेना. शिवाय दानवीर माणसाच्‍या घरात मौल्‍यवान असे काय शिल्‍लक राहणार. जे होते ते त्‍यांनी लोकांना देऊन टाकले होते. शेवटी महा‍कवींचे लक्ष पत्‍नीच्‍या हाताकडे गेले. पत्‍नीच्‍या हातात सोन्‍यांचे कंकण होते. त्‍यांनी एका हातातील कंकण काढून घेतले व त्‍या गरीब माणसाला देऊन टाकले. गरीब माणसाने महा‍कवींचे आभार मानून तो बाहेर पडणार इतक्‍यात कविराजांच्‍या पत्‍नीने त्‍या माणसाला परत बोलावले व आपल्‍या हातातील दुसरे कंकणही त्‍याला दिले व म्‍हणाली,''मुलीच्‍या लग्‍नात एकच कंकण कसे तिला देणार तिला रिकाम्‍या हाताने पाठवू नकोस.'' या दांपत्‍याच्‍या दानी वृत्तीला गरीबाने साष्‍टांग नमस्‍कार केला.
तात्‍पर्य – आपली परिस्थिती नसतानाही दुस-याला मदत करणे हीच खरी माणुसकी.
वर्तमानपत्रातून संग्रहित

३४ समर्पण
एका गावात एक संत राहात होते. ईश्‍वराच्‍या भक्तीत तल्लीन होऊन राहत असत. त्‍यांचे कोणतेही कार्य ईश्‍वराला समर्पित असे. एकदा ते खूप आजारी पडले. त्‍यांच्‍या भक्तांनी अनेक वैद्यांना पाचारण केले पण गुण काही येईना. त्‍यांचा आजार हा त्‍यांना घट्ट चिकटून बसला होता जणू. आजारपणातही त्‍यांचेकडून नामस्‍मरण मात्र सारखे सुरुच होते. अनेक प्रकारच्‍या वेदना होत असताना देखील ईश्‍वराबद्दल कोणतीही तक्रार त्‍यांच्‍या मुखातून बाहेर पडत नव्‍हती. एकेदिवशी त्‍यांचा एक शिष्‍य त्‍यांच्‍याजवळ आला व काहीच न बोलता तो नुसता त्‍यांच्‍यासमोर बसून राहिला. त्‍याला काहीतरी सांगायचे आहे हे संतांनी ओळखले व म्‍हणाले,''बाळा, तुला जर काही मला सांगायचे असेल तर पटकन सांगून टाक.'' संतांच्‍या या बोलण्‍यामुळे शिष्‍य हिंमत करून म्‍हणाला,''महाराज तुम्‍हाला इतक्या वेदना होत असतानाही त्‍या ईश्‍वराचेच नामस्‍मरण करत आहात हे काही पाहवत नाही. औषधांची मात्रा चालत नाही. अशा अवस्‍थेत तुम्‍ही ईश्‍वराकडे आजार दूर करण्‍यासाठी प्रार्थना का करत नाही. तुमच्‍या प्रार्थनेला ईश्‍वर काही ना म्‍हणणार नाही.'' त्‍याचे हे बोलणे ऐकून संत म्‍हणाले,'' अरे आजार हा कुणाच्‍या मर्जीने मला प्राप्त झाला हे तर तुला ठाऊक आहे. मला आजार होण्‍यास प्रभूचीच मर्जी असेल तर मी कुठल्‍या तोंडाने त्‍याला तो कमी करण्‍यास सांगू. त्‍याच्‍या मर्जीशिवाय तर काहीच चालत नाही. त्‍याच्‍या इच्‍छेविरूद्ध मी आजारापासून मुक्त व्‍हावे म्‍हणून मी कशी काय प्रार्थना करू. त्‍यानेच जर मला आजारी केले आहे तर तोच मला बरे करणे अथवा न करणे त्‍याच्‍या हातात राखून आहे. आपण मात्र त्‍याच्‍यावर अखंड विश्‍वास ठेवून राहणे हेच बरे.'' संतांच्‍या या बोलण्‍यामुळे भक्ताने आपल्‍या विचारसरणीत बदल घडविला.
तात्‍पर्य – खरी भक्ती ही समर्पित भावनेने केली जाते. जेथे समर्पणाची भावना असते तेथे सुख आणि दु:ख एकसमान अनुभूती देतात.

३५ प्रत्‍यक्ष अनुभव
एका आश्रमात एक महात्‍मा राहत होते. त्‍यांच्‍या आश्रमात रोज सकाळी व संध्‍याकाळी धूप जाळला जात असे. धूपामुळे कीडे, कीटक आदींची संख्‍या कमी होते तसेच वातावरणातील जंतूची संख्‍याही कमी होते हे महात्‍म्‍यांना माहिती असल्‍याने त्‍यांनी धूप जाळण्‍याची पद्धत नित्‍यनेमाने सुरु ठेवली होती. आश्रमात धूप जाळला जाई तर आश्रमाच्‍या मागील बाजूच्‍या गोठ्यात कडुनिंबाचा पाला जाळला जाई कारण कडुनिंबाच्‍या पाल्‍याच्‍या धुरानेही कीडे-कीटक येत नाहीत. आश्रमातील एका शिष्‍याला मात्र हा भेदभाव पटला नाही. तो महात्‍म्‍यांना जाऊन म्‍हणाला,''गुरुदेव, आपल्‍याला माणसांना मात्र धूपाचा सुंदर वास तर दूधदूभते देणा-या जनावरांना मात्र कडुनिंबाचा कडवट वास असलेला धूर आपण देत आहोत. हे काही मला बरे वाटत नाही. तसेही आपल्‍या धर्मानुसार सर्वप्राण्‍यांमध्‍ये एकच परमेश्‍वर वसलेला आहे. आपल्‍या आत्‍म्‍याला चांगला वास आणि पशूंच्‍या आत्‍म्‍याला कडवट वास हे तुम्‍हाला पटते काय'' महात्‍मा म्‍हणाले,'' तुझे हे म्‍हणणे मलाही पटते. आजपासून तूच दोन्‍हीकडे धूप जाळत जा आणि एक महिन्‍यानंतर मला येऊन सांग'' त्‍या शिष्‍याने महिनाभर आश्रमात व गोठ्यात दोन्‍हीकडे धूप जाळला. सर्वत्र सुवास दरवळला होता. महिन्‍यानंतर तो शिष्‍य महात्‍म्‍यांकडे गेला असता ते म्‍हणाले,'' अरे मुला, आपल्‍या आश्रमाला दोन्‍हीकडे धूप जाळणे हे आर्थिकदृष्‍ट्या परवडत नाही. हे खूप खर्चिक होत आहे. तेव्‍हा काय करायचे हे तू बघ'' शिष्‍याने मग काहीच न बोलता दोन्‍हीकडे कडुनिंबाचा पाला जाळणे सुरु केले. किडे,कीटक तर निघून जायचे पण कडवट धुराच्‍या वासाने आश्रमात येणा-या भक्तांची संख्‍या मात्र कमी झाली. पंधरा दिवसांनंतर शिष्‍याला हे लक्षात आले व तो महात्‍म्‍यांकडे गेला. त्‍याने महात्‍म्‍यांची क्षमा मागितली व त्‍यांच्‍या आज्ञेनुसार पहिल्‍याप्रमाणे धूप व कडवट पाला योग्‍य ठिकाणी जाळणे सुरु झाले.
तात्‍पर्य – प्रत्‍यक्ष अनुभूती मिळाल्‍याशिवाय मनुष्‍य शहाणा होत नाही.

३६ शौर्य आणि शहाणपण
रामाच्‍या सेनेत एक वानर होता. त्‍याच्‍या मनात एकदा आले की, रामात आणि आपल्‍यात काय फरक आहे. त्‍याला असलेले सर्व अवयव आपल्‍याला आहेत आणि आपल्‍याला एक शेपूटही जास्‍त आहे. सुग्रीवाने आपल्‍या सहका-याच्‍या मनातला भाव ओळखला. सुग्रीवाला किंचीत राग आहे. रामानेही त्‍याच्‍या मनातला भाव ओळखला पण त्‍याने त्‍या वानराला पुढे बोलावले व सांगितले,'' आज तू वानरसेनेचे आधिपत्‍य कर.'' वानर खूष झाला. राक्षससैन्‍य चालून येऊ लागले. धुडगुस घालू लागले. याबरोबर या वानरसेनापती महाशयांनी शेपटीने एक झाड उपटले आणि शेकडो राक्षसांवर फेकून दिले. त्‍याचा पराक्रम पाहून सुग्रीवही हरखून गेला. आता सुग्रीवाच्‍या मनातही रामात आणि या वानरात काय फरक आहे हा विचार येऊ लागला. हा विचारही रामाला कळून चुकला पण प्रभू रामचंद्र गप्‍प राहिले. काही वेळाने शस्‍त्रांचा उपयोग होत नाही हे पाहून राक्षसांच्‍या सेनापतीने युक्ती केली व त्‍याने मोठेमोठे नारळ काढून वानरसैन्‍याकडे फेकायला सुरुवात केली. वानरसैन्‍याने या नारळांचे काय करायचे हे न सुचल्‍याने ते फोडून खायला सुरुवात केली. वानरसैन्‍य व सेनापती नारळ खात आहेत हे पाहून राक्षससेनापतीने आपल्‍या सैन्‍यानिशी मोठा हल्ला केला व काही वानरांना ठार केले. यावरही प्रभू रामचंद्रांचे लक्ष होते. त्‍यांनी राक्षससैन्‍यावर बाणांनी हल्ला केला व राक्षससैन्‍यास मागे फिरवले. यात सुग्रीवाला रामचंद्र व वानर यांच्‍यातील फरक लक्षात आला.
तात्‍पर्य : माणसाचा मोठेपणा हा शौर्यापेक्षा शहाणपणाने ठरतो.

३७ आत्‍मज्ञान
एक संत वनात कुटी बांधून राहत होते. कंदमुळे खाऊन ते गुजराण करत असत आणि परमेश्‍वराचे चिंतन करत. वनातून जाणारा कोणी त्‍यांची कुटी पाहून थांबत असे. तेव्‍हा ते त्‍याच्‍याशी प्रेमाने बोलत. जे काही जवळ असेल ते त्‍याला खाऊ घालत. एक दिवस एक तरूण त्‍यांना भेटायला आला. त्‍यांच्‍या बोलण्‍याने तो प्रभावित झाला आणि त्‍यांचा शिष्‍य बनून तेथेच राहू लागला. संताने त्‍याला तपश्‍चर्या कशी करतात याविषयी माहिती दिली. शिष्‍याने गुरुच्‍या शिकवणीप्रमाणे वाटचाल सुरु केली. गुरुशिष्‍य स्‍नेहभावनेने राहू लागले. एकदा संत त्‍याला म्‍हणाले,'' मन मोठे चंचल असते, त्‍याला नियंत्रणातच ठेवले पाहिजे.'' ही गोष्‍ट शिष्‍याच्‍या मनावर ठसली. त्‍या दिवसापासून त्‍याने स्‍वत:ला एका खोलीत बंद करून घेतले. संताने त्‍याला विचारले असता शिष्‍य म्‍हणाला की, तो त्‍याच्‍या मनावर ताबा मिळविण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. शिष्‍य रात्रंदिवस खोलीतच राहू लागला. आश्रमात येणा-या जाणा-याकडे तो अजिबात लक्ष देईनासा झाला. एकेदिवशी गुरुने शिष्‍याला खोलीचा दरवाजा उघडावयास सांगितले. गुरु आत आले ते हातात एक वीट घेऊनच. गुरुंनी शिष्‍याला काहीच न बोलता ती वीट एका दगडावर घासायला सुरुवात केली. शिष्‍याने विचारले की, गुरुजी हे काय करताय तुम्‍ही. गुरु म्‍हणाले, या विटेपासून आरसा बनवायचा आहे. शिष्‍य म्‍हणाला, गुरुजी असे कसे शक्‍य आहे. गुरुजी शांतपणे शिष्‍याला म्‍हणाले,'' ज्‍याप्रमाणे विटेचा आरसा बनू शकत नाही तसे मनाचा आरसा बनू शकत नाही. मन तर धूळ आहे जी आत्‍म्‍यावर पडलेली असते. ती धूळ विसरण्‍याचा प्रयत्‍न केला तरच खरेपणा दिसून येतो.'' शिष्‍याला गुरुची शिकवण समजून आली.
तात्‍पर्य – चंचल मनाला नियंत्रणात ठेवूनच प्रगती साधता येते.

३८ लबाडी उघडकीस येते.
एक राजा रात्रीच्‍या वेळी वेश बदलून फिरत असताना एका बागेत चार मैत्रिणी बोलत होत्‍या. पहिली म्‍हणत होती की, मांस स्‍वादिष्‍ट असते. दुसरी म्‍हणत होती की, दारूचा स्‍वाद खूप चांगला असतो तर तिसरी म्‍हणत होती की प्रेम हेच सर्वश्रेष्‍ठ असते तर चौ‍थी म्‍हणाली की, खोटे बोलणे हे सगळयात चांगले असते. राजाने चौघींना बोलावले आणि आपले म्‍हणणे सिद्ध करून दाखविण्‍यास सांगितले. पहिली म्‍हणाली की मांसाचा कोणताच भाग वाया जात नाही म्‍हणून ते चांगले असावे पण मी कधीच खाल्ले नाही. दुसरी म्‍हणाली, दारू ज्‍यावेळेला मस्‍तकात जाते, नशा चढते तेव्‍हा दारूचा स्‍वाद खूप चांगला वाटतो. तिसरी म्‍हणाली, प्रेम हे व्‍यक्तिसापेक्ष असते. कुणी कुणावर, कशावरही प्रेम करू शकते म्‍हणून प्रेम श्रेष्‍ठ आहे तर चौथी म्‍हणाली, महाराज जगात असा कुणीच नाही ज्‍याने खोटे बोलणे टाळले आहे. प्रत्‍येक जण कधी ना कधी खोटे बोलतोच. राजा म्‍हणाला, मी कधीच खोटे बोलत नाही आणि मी खोटे बोलतो आहे असे तू सिद्ध करून दाखव. चौथ्‍या महिलेने राजाला व त्‍याच्‍या सर्व मंत्र्यांना तिच्‍या घरी येण्‍याचे निमंत्रण दिले. घर पूर्ण दाखवल्‍यावर शेवट तिने एका मोकळया खोलीत सर्वाना नेले व रिकाम्‍या भिंतीकडे बघून तिने नमस्‍कार केला व म्‍हणाली, जे कुणी पुण्‍यवान आहेत त्‍यांना समोर साक्षात देवाचे दर्शन होईल. राजा व मंत्री यांची चलबिचल सुरु झाली. कारण नमस्‍कार न करावा तर आपण पापी ठरतो म्‍हणून सर्वांनीच हात जोडले व खोलीच्‍या बाहेर आले. बाहेर येताक्षणी महिला राजाला म्‍हणाली, महाराज तुम्‍हीसुद्धा हात जोडले याचाच अर्थ माझ्या खोट्या बोलण्‍याला तुम्‍ही दुजोरा दिला. मी खोटे सांगितले तरीही तुम्‍ही खोट्या देवाला नमस्‍कार केला आणि तुम्‍हीसुद्धा खोटे बोलता हे सिद्ध झाले.

३९ गर्विष्ठ मेणबत्ती
एकदा एका गृहस्थाने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी बोलाविले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठया मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते, ते पाहून मेणबत्तीला स्वत:चा अभिमान वाटला, आपल्या प्रकाशाचा केवढा उपयोग आहे असे वाटून ती गर्वाने म्हणाली, "ज्या वेळी व ज्या ठिकाणी सूर्यचंद्राचा प्रकाश पोहोचू शकत नाही. त्या वेळी व त्या स्थळी माझा प्रकाश पडू शकतो, चंद्रसूर्यही माझ्यापुढेही क्षुद्र वाटतात.' तिचे हे गर्वाचे बोलणे ऐकून जेवणारी मंडळी हसली. त्यातला एक जण उठला. त्याने खिडकी उघडली. त्याबरोबर हवेची झुळूक आली व मेणबत्ती विझली. नंतर त्याने पुन्हा खिडकी बंद केली व मेणबत्ती पेटविली. मग तो गृहस्थ मेणबत्तीला म्हणाला, 'अगं वेडे आता तरी प्रकाश दे, एवढयाशा झुळकेने विझतेस, चंद्रसूर्याला क्षुद्र समजतेस त्यांच्यापेक्षा श़ेष्ठ असल्याची मिजास करतेस. चंद्रसूर्य कधी तुझ्यासारखे वाऱ्याच्या झुळकेने विझून गेले आहेत का?'
तात्पर्य : आपल्यावर सोपवलेली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडण्यातच मोठेपण आहे.

४० अतिरेक वाईटच
एक माणूस आपल्‍या पत्‍नीच्‍या अतिकंजुषपणामुळे फार वैतागुन गेला होता. तो जेव्‍हा एखाद्या गरजूला मदत करायला जायचा तेव्‍हा त्‍याची बायको त्‍याच्‍या या प्रयत्‍नात खोडा घालत असे. तिला कायम वाटायचे जगात मोठमोठे शेठ-व्‍यापारी हे दान देण्‍यासाठी आहेत मग आपल्‍यासारख्‍या सामान्‍य माणसांनी काय म्‍हणून दान करावे. बायकोच्‍या या विचारसरणीमुळे माणूस जेरीला आला होता. शेवटचा उपाय म्‍हणून तो एका संतांकडे गेला व त्‍यांना सगळी हकिकत सांगून त्‍याने यावर संतांना उपाय विचारला असता संतांनी त्‍याला बायकोला बरोबर घेऊन येण्‍यास सांगितले. दुसरे दिवशी तो माणूस पत्‍नीसह संतांकडे पोहोचला तेव्‍हा संतांनी त्‍याच्‍या पत्‍नीला आपल्‍या हाताची बंद मूठ दाखविली. तेव्‍हा पत्‍नीने या गोष्‍टीचा अर्थ विचारला असता संत म्‍हणाले,'' माझी मूठ जर अशीच कायम बंद राहिली तर काय होईल.'' ती म्‍हणाली,''अशी जर कायमच मुठ बंद करून बसाल तर तुमच्‍या हातात व्‍यंग निर्माण होईल.'' संत म्‍हणाले,'' आणि जर मूठ उघडून हात कायमच सरळ करून ठेवला तर काय होईल'' ती महिला म्‍हणाली,'' मग हा पुन्‍हा कधीच बंद होणार नाही अशा प्रकारचे व्‍यंग निर्माण होईल.'' संत यावर त्‍या महिलेला म्‍हणाले,'' याचा अर्थ कोणत्‍याही गोष्‍टीचा अतिरेक हा वाईट आहे. जर हात बंद करून किंवा सरळ करून हातात व्‍यंग निर्माण होत असेल तर आपल्‍या प्रवृत्तीमध्‍ये सुद्धा व्‍यंग निर्माण होते. आपण गरजूना त्‍याच्‍या गरजेप्रमाणेच मदत केली जावी असे माझे तुला यातून सांगणे आहे. कृपया तू आपल्‍या वागण्‍यात बदल करावा.'' महिलेला संतांचा उपदेश पटला व तिने आपल्‍या पतीला गरजूना मदत करण्‍यास आडकाठी केली नाही.
तात्‍पर्य : कोणत्‍याही गोष्‍टीचा अतिरेक वाईटच असतो.

४१ परिश्रमांची किंमत
एक प्रजादक्ष राजा होता. तो नियमितपणे वेश बदलून नगरात फिरायचा आणि प्रजेची हालचाल ज्ञात करून घेत असे. प्रजेवर येणारे कोणतेही संकट किंवा गरज राजापासून लपून राहत नव्‍हती. एकदा राजाने विचार केला की सीमेलगतच्‍या गावातील परिस्थिती पाहून घ्‍यावी. तो आपल्‍या सहाय्यकास सोबत घेऊन तो घोड्यावरून रवाना झाला. दोनचार गावे फिरला तेथील समस्‍या जाणून घेतल्‍यानंतर सहाय्यकास त्‍याने योग्‍य त्‍या सूचना दिल्‍या आणि पुढील गावाकडे कूच केले. रस्‍त्‍यामध्‍ये एक हडकुळा लाकुडतोड्या लाकडे तोडत असताना राजाला दिसला. लाकुडतोड्याचे पूर्ण अंग घामाने थबथबले होते. राजाला त्‍याची दया आली. राजा त्‍याच्‍याशी काही बोलणार इतक्‍यात राजाचे लक्ष त्‍याच्‍या कडेला असणा-या दगडाकडे गेले. तेथे काहीतरी चमकत असल्‍याचे राजाला दिसून आले. राजाने जवळ जाऊन पाहिले असता राजाला लक्षात आले की या शिळेमध्‍ये हि-याचे तुकडे आहेत. राजाला मोठे आश्‍चर्य वाटले की लाकुडतोड्याचे याकडे कसे काय लक्ष गेले नाही. राजा लाकुडतोड्याला म्‍हणाला,''अरे बाबा, तू एवढे परिश्रमाचे काम करण्‍यापेक्षा या शिळेतील एखादा जरी तुकडा नेऊन विकलास तरी आयुष्‍यभर पुरेल एवढे धन तुला मिळू शकते तरी पण तू का परिश्रम करून स्‍वत:ला शिणवून घेत आहेस का तुला हे हिरे दिसलेच नाहीत '' लाकुडतोड्याने आपले काम न थांबवता त्‍याला सांगितले,''राजन हा हिरेयुक्त दगड या परिसरात सापडतात हे मी लहानपणापासूनच मी पहात आलो आहे. पण देवाने माझे हात आणि पाय मला परिश्रम करण्‍यासाठी दिले आहेत. ऐषोराम करण्‍यासाठी दिले नाहीत. ज्‍यांच्‍याकडे करण्‍यासाठी काही पुरुषार्थ नसतो अशांना हि-यांची गरज भासते. देवाच्‍या दयेने माझे शरीर अजूनही या वयात धडधाकट आहे, माझे काम मी करू शकतो. तेव्‍हा आतातरी मला या हि-यांची गरज नाही.'' राजाला लाकुडतोड्याकडून एक धडा मिळाला.

४२ सत्‍कारणी दान
एका गावात शिमक नावाचा एक धनवान माणूस राहत असे. फार विचारपूर्वक तो आपला पैसा खर्च करत असे. त्‍याने कधीही पैशाचा दुरूपयोग केला नाही. त्‍यामुळेच त्‍याला लोक 'कंजुष' म्‍हणत असत. लोक काय म्‍हणतील याचा त्‍याने कधीच विचार न करता आपला पैसा जोडून ठेवला होता. एकदा त्‍याला खूप ताप आला. त्‍याच्‍या मुलांनी व नातवांनी त्‍याच्‍यावर उपचार करण्‍याचे सुचविले असता शिमक म्‍हणाला,'' औषधांनी केवळ तापाचा प्रभाव कमी होईल पण रोग समूळ नष्‍ट होणार नाही. निसर्गनियमानुसार ताप आपोआप कमी होऊन जाईल व मी बरा होईन'' शिमकच्‍या या गोष्‍टीचीही लोकांनी कंजुषपणातच गणना केली. शिमकने सर्वाचे म्‍हणणे ऐकले पण तो आपल्‍या मनाला येईल तेच योग्‍य याप्रमाणे वागत राहिला. त्‍याच्‍या नगरातील एक विद्वान आचार्य महिधरांनी वेदांवर काही ग्रंथ लिहीलेले शिमकच्‍या कानी आले. पण आचार्यांच्‍याकडे ते ग्रंथ प्रकाशन करण्‍यासाठी पुरेसे धन उपलब्‍ध नव्‍हते. शिमकला ही माहिती मिळताक्षणी तो आचार्यांकडे गेला व म्‍हणाला,''आचार्य, ज्ञान हे प्रवाही असावे. ज्ञानाचा प्रभाव हा समाजकारणासाठी झाला पाहिजे. ज्ञान वाटूनच समाजातील अनेक दुष्‍प्रभाव कमी करता येतील. या ग्रंथ प्रकाशनासाठी आपणास जितके धन हवे आहे तितके धन मी तुम्‍हाला द्यायला तयार आहे पण ग्रंथ प्रकाशन करून तुम्‍ही समाजाला शिक्षित करावे ही माझी विनंती.'' आचार्य महिधरांनी शिमककडून योग्‍य तेवढे धन घेऊन ग्रंथांचे प्रकाशन केले व शिमकला त्‍या ग्रंथप्रकाशनास बोलावले तेव्‍हा शिमकला मोठी धन्‍यता वाटली. लोकांनी शिमकच्‍या या उदारपणाचे कौतुक केले तेव्‍हा शिमक म्‍हणाला,'' माझ्याकडे असणा-या संपत्तीतून जर माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी जर काही धन खर्च झाले असते तर त्‍यात विशेष असे काहीच नव्‍हते पण समाजासाठी मी काही धन देऊ शकलो याचा मला आनंद आहे.''
तात्‍पर्य – अपार संपत्ती जवळ आहे म्‍हणून तिचा मनमुक्तपणे उपभोग घेणे किंवा उधळपट्टी करणे यात शहाणपणा नसून त्‍या संपत्तीतून काही विधायक कार्य कसे करता येईल हे पाहणे गरजेचे आहे.

४३ आनंद कसा मिळवाल ?
एका साधूने जंगलातील गुहेत बसून अनेक वर्षे घनघोर तपश्‍चर्या केली. परंतु परमेश्‍वर दर्शनाची त्‍याची इच्‍छा काही पूर्ण झाली नाही. एकदा हिमालयातील एक ज्‍येष्‍ठ ऋषी तिकडून जात होते. त्‍यांचे दर्शन या साधूला घडले. साधूने ऋषींना आपली इच्‍छा बोलून दाखविली. ऋषी म्‍हणाले,''शेजारच्‍या गावात एक भिक्षूक राहतो. त्‍याला सदैव आनंदी पाहून असे वाटते की त्‍याने परमेश्‍वर पाहिला असावा. तू त्‍याची गाठ घे व माहिती मिळव.'' दुस-याच दिवशी साधूने त्‍या भिक्षूकाची गाठ घेतली. तो आपल्‍याच नादात तल्लीन होत भजन गात होता. साधूने त्‍याला विचारले,''बाबा रे, तू असे कोणते पुण्‍यकर्म केले की ज्‍यामुळे तुझ्यावर परमेश्‍वर प्रसन्न झालेला आहे.'' भिक्षूक म्‍हणाला,''साधूमहाराज, मी ना तपश्‍चर्या केली, ना दान केले, ना पुण्‍य जोडले, ना कधी मी कुठल्‍या मंदिरात गेलो. कधी उपवास सुद्धा केला नाही.'' साधूला आश्‍चर्य वाटले व तो म्‍हणाला,'' असे सर्व असतानासुद्धा तू आनंदी कसा आणि तू भिक्षूक कसा काय बनलास.'' भिक्षूक म्‍हणाला,'' महाराज मी पूर्वी एक श्रीमंत माणूस म्‍हणून जगत होतो. पण एकेदिवशी रस्‍त्‍याने जाताना एक महिला व तिचे तान्‍हे बाळ रडताना मी पाहिले. तिला मी विचारपूस केली असता मला कळाले की तिच्‍या पतीने कर्ज न चुकविल्‍यामुळे सावकाराने त्‍याला बंदी करून नेले आहे व त्‍यांची सर्व मालमत्ता जप्‍त केली आहे. स्‍त्री सुंदर असल्‍यामुळे येणारे जाणारे वाईट नजरेने तिच्‍याकडे पाहत आहेत.'' भिक्षूक म्‍हणाला की मला तिचे दु:ख पाहवले नाही. त्‍यांचे कर्ज फेडण्‍यासाठी मी माझी सर्व संपत्ती देऊन टाकली. घरदार सर्व विकून टाकले व त्‍यांना सोडवून आणले. तेव्‍हापासून मी भिक्षूक झालो. मी आतासुद्धा सुखी आहे कारण देण्‍यातला आनंद काय आहे हे मला कळाले आहे.'' साधूला भिक्षूकाला काय सांगायचे आहे ते कळून चुकले.
तात्‍पर्य :- दुस-याला सुखी करणारेच संतपदाला पोहोचू शकतात. साधूपणा हा पोशाखावरून किंवा तपश्‍चर्येतून ठरत नसतो तर तो सर्व जीवमात्रांना सुखी करण्‍यातून ठरत असतो.

४४ अहंकाराने पराभव
एक जातक कथा आहे. गंधर्वकुळातील गुत्तिलकुमार नावाचा एक गंधर्व वीणा वादनात सिद्धहस्‍त होता. संपूर्ण वाराणसीत त्‍याची ख्‍याती पसरलेली होती. त्‍याच वेळी उज्‍जयिनीमध्‍ये मुसिल नावाचा एक गंधर्व राहत होता. एकदा त्‍याला उज्जयिनीच्‍या राजदरबारात वीणा वादनासाठी निमंत्रित केले होते. मुसिलचे वीणावादन कोणालाच आवडले नाही. त्‍यानंतर मुसिलने गुत्तिलकडे शिकण्‍याचा निश्‍चय केला. मुसिल वाराणसीत गुत्तिलकडे गेला. त्‍याने त्‍याचे शिष्‍यत्‍व पत्‍करले. शिक्षण पूर्ण झाल्‍यावर त्‍याने गुत्तिलकडे राजदरबारात काम करण्‍याची इच्‍छा प्रकट केली. गुत्तिलने मोठ्या मनाने राजाशी त्‍याची भेट घालून दिली. राजाने गुत्तिलला जेवढे मानधन होते त्‍यापेक्षा अर्ध्‍या मानधनात काम करण्‍याचे सांगितले. मुसिलचा अंदाज होता की आपल्‍यालाही तितकेच मानधन मिळायला कारण आपणही गुत्तिलच्‍या इतके श्रेष्‍ठ कलाकार आहोत. राजाने मुसिलला आपली क्षमता सिद्ध करण्‍यास सांगितले. त्‍या स्‍पर्धेत गुत्तिलने एक कठीण तान छेडली जी त्‍याने मुसिलला शिकविली नव्‍हती. शेवटी अशा प्रकारची तान न छेडता आल्‍याने मुसिलला आपला पराभव मान्‍य करावा लागला.
तात्‍पर्य : गुरुलाच अहंकाराने आव्‍हान देणे कधीच योग्‍य ठरत नाही.

४५ वृक्षसेवेतून समृद्धी
एका गावात एक विधवा महिला आणि तिचा जगत नावाचा मुलगा राहत होते. त्‍यांच्‍या घराजवळ एक पिंपळाचे झाड होते. जगत आईच्‍या सांगण्‍यावरून त्‍या झाडाला रोज पाणी देत असे. त्‍याच्‍याजवळचा परिसर स्‍वच्‍छ ठेवत असे. एकदा जगत आजारी पडला तरी त्‍याने झाडाला पाणी देण्‍याचे व स्‍वच्‍छतेचे काम चालूच ठेवले. आजारपणातही हा मुलगा आपली सेवा करत आहे हे पाहून पिंपळवृक्षात निवास करणा-या एका देवतेला खूप समाधान वाटले. जगत जवळ येताच देवता त्‍याच्‍याशी बोलू लागली,'' हे मुला मी तुझ्या या सेवेवर प्रसन्‍न झालो आहे. तुला जो काही वर पाहिजे आहे तो मागून घे.'' जगत म्‍हणाला,'' हे वृक्षदेवते, मी तुमची सेवा काही मिळवायची अपेक्षा ठेवून करत नाही. तुमच्‍यामुळे आम्‍हाला स्‍वच्‍छ हवा, सावली आणि लाकूड मिळते. आमच्‍या जीवनाचा तूच एकमेव आधार आहेस. मला काहीही नको.'' यावर वृक्षदेवतेने त्‍याला काहीतरी मागण्‍याचा हट्टच धरला. तेव्‍हा जगतने झाडाखाली पडलेली पाने नेण्‍याची इच्‍छा व्‍यक्त केली. पिंपळदेवतेने त्‍याला अनुमती दिली. जगतने पाने गोळा केली व घरी आणून एका कोप-यात ठेवली. दुस-या दिवशी सकाळी जेव्‍हा तो व त्‍याची आई उठून पाहतात तर काय पिंपळाची सगळी पाने सोन्‍याच्‍या पानात बदलली होती. जगतने वृक्षदेवतेचे आभार मानले.
तात्‍पर्य – निरपेक्षबुद्धीने सेवा केल्‍यास आपल्‍याला फळ निश्चितच मिळते.

46 धाडसामुळे यश
एक लोककथा आहे. एक शेतकरीदादा शेतात नांगरणी करत होता. तेवढ्यात एक वाघ त्‍याच्‍यासमोर येऊन उभा राहिला. वाघाने शेतक-याला धमकावले की तुझा बैल मला खायला दे नाहीतर मी तुला खाऊन टाकीन. शेतकरी भीतीने थरथरत वाघाला म्‍हणाला,''वाघोबा, तुम्‍ही इथेच थांबा, मी घरी जाऊन तुमच्‍यासाठी माझी गाय घेऊन येतो. कारण माझा बैल जर तुम्‍ही खाल्‍ला तर मी नांगरणी कशी करणार.'' असे सांगून शेतकरी घरी गेला व घरी जाऊन त्‍याने वाघाचे सर्व म्‍हणणे बायकोला सांगितले. बायको धाडसी होती. ती शेतक-याला म्‍हणाली,''वाघाला जाऊन सांगा की माझी बायको तुला खाण्‍यासाठी घोडा घेऊन येत आहे. गायीने तुझे पोट भरणार नाही त्‍यापेक्षा घोडा खा.'' शेतकरी शेतात गेला व वाघाला त्‍याने बायकोचा निरोप सांगितला. शेतक-याच्‍या बायकोने राक्षसासारखा पोशाख केला. तिने कमरेला तलवार लटकावली व घोड्यावरून दौडत दौडत, मोठमोठ्याने किंचाळत ती शेतात गेली. तेथे पोहोचताच ती शेतक-यावर ओरडली,'' तुम्‍ही तर चार चार वाघांना धरले आहे असे सांगत होतात आणि मला तर इथे एकच वाघ दिसतोय बाकीचे तिघे कुठे गेले. तरीपण हा वाघ पटकन धरा आपण घरी जाऊन यालाच शिजवून खाऊया.'' हे ऐकताक्षणी वाघाने तिथून सुंबाल्‍या केला. वाघ पळून जात असताना एका रानडुकराने हा प्रसंग पूर्ण पाहिला होता. त्‍याने पळणा-या वाघाला थांबवून सांगितले,'' तू तर वाघ आहेस आणि एका बाईला घाबरला. ती राक्षस नसून त्‍याच शेतक-याची बायको आहे. नीट बघ आणि थोडा प्रयत्‍न कर तुला बैल मिळालाच म्‍हणून समज.'' पण वाघ राक्षसरूपातल्या शेतक-याच्‍या बायकोला इतका घाबरला होता की त्‍याने परत जाण्‍यास नकार दिला पण त्‍याने रानडुकरालाच तिच्‍याकडे जाण्‍यास सांगितले. रानडुकर पुढे गेले आणि वाघ त्‍याच्‍या मागोमाग गेला. रानडुकराला आपल्‍या येताना पाहून बायको जोरात ओरडली,'' अरे रानडुकरा, तुला तर मी चार वाघ शेपटीला बांधून आणायला सांगितले होते आणि तू फक्त एकच आणलास. याने माझी भूक भागणार नाही. हा वाघ येथेच ठेवून जा आणि बाकीचे तीन घेऊन ये.'' आता रानडुकर आणि वाघ दोघेही घाबरले आणि जोरात पळाले. जंगलात पुढे जाताच वाघाने रानडुकराची शिकार केली व त्‍यातच रानडुकराचा मृत्‍यू झाला.
तात्‍पर्य – प्रतिकूल परिस्थितीमध्‍येही शांतपणे व धाडसीवृत्तीने वागल्‍यास हमखास यश मिळतेच.

४७ उपयुक्तता
दोन मित्र होते. दोघांनाही झाडाफुलांची आवड होती. दोघांनीही एकाच गावात जमीन खरेदी केली. रस्‍त्‍याच्‍या या बाजूला गोविंदाची आणि दुस-या बाजूला गोपाळाची जागा होती. दोघांनी मिळून ठरवले की आपण या जागांमध्‍ये झाडे लावायची. आपल्‍या बागेची जगात तारीफ झाली पाहिजे. दोघांनीही जमिनीची मशागत केली आणि मग तिथे झाडे लावली. रस्‍त्‍याच्‍या डाव्‍या बाजूला गोविंद उद्यान आणि उजव्‍या बाजूला गोपाळ उद्यान उभे राहिले. गोविंदाने आपल्‍या जागेत फक्त सुरुची झाडे लावली. उंच-उंच हिरवेगार सरळसोट सुरु वृक्ष वाढले. आभाळाच्‍या निळाईशी जणू त्‍या झाडांची टोके खेळत होती. दूरवरून पाहिलं तर शे-पाचशे सुरुच्‍या झाडांचे उद्यान फारच सुंदर दिसत होतं. रांगेने लावलेल्‍या झाडांमधून गोविंदाने छोट्या वाटा तयार केल्‍या होत्‍या. गोविंद उद्यान बघायला येणारे लोक खुश होऊन जात असत. गोपाळनं आपल्‍या बागेत निरनिराळी फळझाडं, फुलझाडं लावली होती. चमेली, जास्‍वंद, मोगरा, गुलाब, झेंडू, तर वड पिंपळ, आंबा, चिंच, बोरं अशी विविध झाडेझुडपे त्‍यांने आपल्‍या बागेत लावली होती. त्‍या बागेतून जातानासुद्धा छान वाटायचे. फुलांचा मंद सुवास तेथे दरवळत असे. एकदा एक परदेशी प्रवाशांचा जथा दोन्‍ही बागा बघायला तेथे आला. त्‍यांनी पहिल्‍यांदा गोविंदउद्यानाला भेट दिली. बाग बघून ते खुश झाले. त्‍यांनी गोविंदाची स्‍तुती केली. पण दुपार झाली. सूर्य डोक्‍यावर आला आणि सुरुच्‍या झाडाला न फळ न सावली त्‍यामुळे प्रवाशांना उन्‍हाचा त्रास होऊ लागला. ते लगेच गोपाळउद्यानात गेले. आंब्याच्‍या, वडाच्‍या झाडाखाली त्‍यांनी विश्रांती घेतली. तिथल्‍याच काही फळांचा त्‍यांनी आस्‍वाद घेतला. चिंचा, आवळे, पेरू, कै-या त्‍यांनी खाल्‍या. जाताना त्‍यांनी अभिप्राय तेथील वहीत लिहून ठेवला. '' गोविंद उद्यान केवळ सुंदर आहे पण गोपाळउद्यान हे सुंदर तर आहेच पण उपयुक्तही आहे.''
तात्‍पर्य – निसर्गाने दिलेल्‍या शक्तिंचा योग्‍य त्‍या ठिकाणी उपयोग करता आला पाहिजे. निसर्गाचे धन जर योजकतेने वापरले तर ते उपयुक्त ठरतं.

४८ एडिसनचे अमूल्‍य मार्गदर्शन
थॉमस अल्‍वा एडिसन फोनोग्राम तयार करण्‍याच्‍या कामात अगदी गढून गेले होते. नव्‍या शोधामध्‍ये काही ना काही अडचणी येत असतात. एडिसन यांच्‍यापुढेही अशा अडचणी आल्‍या पण ते मागे हटले नाहीत. एक दिवस त्‍यांच्‍यासमोरील तीव्र व हलका आवाज काढणा-या मशीनमध्‍ये काहीतरी बिघाड झाला. त्‍यांनी ही समस्‍या त्‍यांचे सहाय्यक जॉर्ज यांना समजावून सांगितली व ती दूर करण्‍यास सांगितली. जॉर्जने ती समस्‍या दूर करण्‍यासाठी दोन वर्ष प्रयत्‍न केले पण जॉर्जना काही ती समस्‍या दूर करणे जमले नाही. शेवटी जॉर्जचे धैर्य संपले व एक दिवस ते एडिसनकडे गेले व म्‍हणाले,''मिस्‍टर एडिसन, मी तुमचे हजारो डॉलर आणि माझ्या आयुष्‍याची दोन वर्षे निष्‍फळ घालविली आहेत. जर तुमच्‍या जागी जर दुसरा कोणी असता तर मी इतके दिवस वाट न पाहता काम सोडून निघून गेलो असतो पण आता माझे धैर्य संपले आहे मी राजीनामा देतो आहे तो तुम्‍ही स्‍वीकारा.'' असे म्‍हणत त्‍यांनी राजीनामा एडिसनकडे दिला. एडिसन यांनी तो राजीनामा तात्‍काळ फाडून टाकला व जॉर्जना ते म्‍हणाले,'' मी तुझा राजीनामा नामंजूर करतो कारण माझा विश्‍वास आहे की प्रत्‍येक समस्‍या ही आपल्‍याला ईश्‍वराने दिलेली असते, त्‍या समस्‍येचे समाधानही त्‍याच्‍याकडेच असते. आपण बरेचदा त्‍याच्‍यापर्यत पोहोचत नसू पण कुणी ना कुणी तिथपर्यत पोहोचलेले असते किंवा पोहोचण्‍याचा प्रयत्‍न करत असते. तु काही दिवस विश्रांती घेऊन परत ये, पुन्‍हा परिश्रम कर. काय सांगावे या परिश्रमातूनच तुला नवीन शोध लागू शकेल.'' एडीसनचे हे बोलणे ऐकून जॉर्ज पुन्‍हा नव्‍या जोमाने कामाला लागले.
तात्‍पर्य :- परिश्रमाने केलेले कोणतेही कार्य हे निश्चितच फळ मिळवून देते. मात्र परिश्रम न करता फळाची आशा धरणे किंवा कोणीतरी मदत करेल ह्या अपेक्षेत राहणे मूर्खपणाचे ठरते.

४९ कायद्यापेक्षा माणूसकी श्रेष्‍ठ
एकदा एका राजाला सत्ता हाती घेऊन एक वर्ष पूर्ण झाले होते. एकेदिवशी त्‍याच्‍या राज्‍यातील एका विधवेचे पत्र त्‍याच्‍या हाती पडले. त्‍या पत्रात असे लिहीले होते की, तिच्‍या घरात राज्‍याचे तहसील थाटण्‍यात आले असून सरकारतर्फे तिला काहीही भाडे देण्‍यात आले नव्‍हते. तिची अशी विनंती होती की, राजाने या गोष्‍टीत स्‍वत: लक्ष घालून तिला त्‍या घराचे भाडे मिळवून द्यावे. यावर राजाने त्‍या पत्रावर लिहीले की हे कार्यालय जप्‍त करण्‍यात यावे. या आदेशानंतर महिलेने तहसीलवर दावा ठोकला पण तहसीलतर्फे दिल्‍या गेलेल्‍या भाडेकराराची मुदत संपली असल्‍याने ती महिला खटला हरली. कायद्यानुसार हे कार्यालय सरकारचेच होते. कार्यालय सुरु असतानाच्‍या काळात सरकारने भाडे दिले नाही व आता कराराची मुदत संपली असल्‍याने सरकार कोणतेही भाडे देण्‍यास नाकारीत होते. यामुळे महिलेचा हक्क संपुष्‍टात आला होता. महिलेने पुन्‍हा राजाकडे धाव घेतली. राजाने सर्व प्रकरणाची माहिती घेतली व आदेश दिला की, मानवनिर्मित कायद्यानुसार विधवेला कोणतीही आर्थिक मदत मिळू शकणार नाही मात्र ईश्‍वरनिर्मित कायद्यानुसार तिचे पालनपोषण करण्‍याची जबाबदारी ही सरकारची असल्‍याने तिला योग्‍य ती धनराशी मिळण्‍यास कोणतीच हरकत नाही. सरकारने तिची आर्थिक जबाबदारी उचलण्‍याचे निर्देश राजाने दिले. विधवेला माणुसकीच्‍या दरबारात योग्‍य न्‍याय मिळाला.
तात्‍पर्य :- गरजु व्‍यक्तिंची मदत करताना सर्व कायद्यांपेक्षा श्रेष्‍ठ अशा माणुसकीचा विचार करावा.

५० विवेकानंदांची एकाग्रता
स्‍वामी विवेकानंद जर्मनीला गेले होते. तेथे कील शहरात त्‍यांनी काही काळ व्‍यतीत केला. यादरम्‍यान कील विद्यापीठातील संस्‍कृत विभागाचे प्रमुख पॉल डायसन यांची विवेकानंदांशी भेट झाली. डॉयसनना स्‍वामीजींची विद्वत्ता माहिती होती. दोघांत बराच वेळ चर्चा झाली. यादरम्‍यान डॉयसन काही कामासाठी बाहेर निघून गेले. त्‍यांच्‍या अनुपस्थितीत स्‍वामीजी एक पुस्‍तक वाचू लागले. डॉयसन परतले तरीही स्‍वामीजी पुस्‍तक वाचण्‍यात इतके गढून गेले होते की डॉयसन तेथे आल्‍याचेही त्‍यांच्‍या लक्षात आले नाही. काही वेळाने त्‍यांचे वाचन पूर्ण झाल्‍यावर स्‍वामीजींनी पुस्‍तक बाजूला ठेवले व डॉयसन यांना समोर बसलेले त्‍यांनी पाहिले. स्‍वामीजींनी अनवधानाने झालेल्‍या चुकीबद्दल क्षमा मागितली मात्र डॉयसन यांनी स्‍वामीजींच्‍या एकाग्रतेला व ज्ञान मिळविण्‍याच्‍या प्रयत्‍नांना नमस्‍कार केला.
तात्‍पर्य : ज्ञानप्राप्तीसाठी एकाग्र होणे गरजेचे आहे.

५१ परिश्रमानेच सुख
एका राजाच्‍या दरबारात हि-यांचे तीन व्‍यापारी येऊन म्‍हणाले,''महाराज आम्‍ही आपल्‍या राज्‍यात मौल्‍यवान हिरे विकण्‍यासाठी घेऊन येत होतो. वाटेत डाकूंनी आम्‍हाला लुटले. आता तुम्‍ही आम्‍हाला मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे.'' राजाने त्‍या तिघांना प्रत्‍येकी एक पोते गहू दिले व राजा म्‍हणाला,'' हा गहू तुम्‍ही स्‍वत:च निवडून व दळून त्‍याचे पीठ करावे. त्‍या पीठापासून अन्न तयार करून तुम्‍ही स्‍वत: खावे किंवा गरजूला खाऊ घालावे. एक महिन्‍यानंतर मला येऊन भेटावे.'' तिघांपैकी दोघे हे जरा आळशीच होते. त्‍यांनी पोत्‍यातील थोडे गहू काढून घेतले. बाकीचे गहू त्‍यांनी विकून टाकण्‍यासाठी गिरणीवाल्‍याला दिले. तिसरा व्‍यापारी मात्र मेहनती होता. त्‍याने गव्‍हाचे पोते निवडण्‍यासाठी रिकामे केले असता पोत्‍याच्‍या शेवटी त्‍याला एक मौल्‍यवान हिरा सापडला. त्‍याने तो हिरा पैलू पाडण्‍यास दिला. एक महिन्‍यानंतर तिघेही राजाकडे गेले तेव्‍हा तिस-या व्‍यापा-याने पैलू पाडलेला हिरा राजाला भेट म्‍हणून दिला. तेव्‍हा राजा म्‍हणाला की मित्रा, हा हिरा तुझा आहे. याला विकून जितके काही धन मिळेल त्‍यातून तुझा व्‍यापार तू सुरु कर आणि इतर दोघांच्‍याही पोत्‍यामध्‍ये असाच हिरा होता पण त्‍यांच्‍या आळशीपणामुळे त्‍यांनी तो गमावून बसले.'' दोन आळशी व्‍यापा-यांना स्‍वत:ची चूक कळून चुकली पण वेळ निघून गेलेली होती.
तात्‍पर्य : कठोर परिश्रम करणारेच यशस्‍वी होतात. यशस्‍वी लोकांनाच सुख लाभते.

५२ खरे बोलणे फायदेशीर
आईवडीलांचे छत्र हरपलेला निखील नावाचा एक आठ वर्षाचा चुणचुणीत मुलगा होता. आईवडील त्‍याच्‍या लहानपणीच देवाघरी गेल्‍याने तो त्‍या साठ वर्षाच्‍या आजीसोबत राहत असे. एकेदिवशी बाजार करून परत येत असताना जंगलामध्‍ये तो दरोडेखोरांच्‍या तावडीत सापडला. एकाने दरोडेखोराने रागावून निखीलला विचारले,'' कोण रे तू? इकडे काय करतो आहेस? बघू तुझ्या पिशवीत काय काय आहे ते?'' हे ऐकून खरे तर दुसरा कोणी रडू लागला असता पण निखीलने मनात दाटलेली भिती चेह-यावर न दाखवता मोठ्या हिंमतीने त्‍या दरोडेखोराला म्‍हणाला,'' हे बघा माझ्या पिशवीत काय आहे हे न बघण्‍याचे मी तुम्‍हाला पन्नास रूपये देऊ शकतो. कारण माझ्याकडे आत्ता पन्‍नास रूपये आहेत आणि ते मी माझ्या आजीला चप्पल घेण्‍यासाठी राखून ठेवले आहेत. रानावनात, काट्याकुट्यात फिरताना माझ्या आजीला खूप कष्‍ट पडतात. ती बिचारी तिच्‍या या वयातही माझ्यासाठी कष्‍ट करत आहे. कष्‍टाने मिळवलेल्‍या पैशावर आम्‍ही दोघेही जगत आहोत. आजीने मला भरपूर कष्‍ट करण्‍याची व खरे बोलण्‍याची शिकवण दिली आहे. तुम्‍हाला जर हे कष्‍टाचे पैसे ठेवून घ्‍यायचे असतील तर अवश्‍य घ्‍या पण मी माझे खरे बोलणे सोडणार नाही.'' निखीलचे हे बोलणे ऐकून दरोडेखोर मनातून शरमले व त्‍यांनी त्‍याच्‍या बोलण्‍यातून एक धडा घेतला. दरोडे घालण्‍याचे काम त्‍यांनी सोडून दिले.

५३ जनसेवा हेच पुण्‍य
एका वृद्ध स्‍त्रीच्‍या आयुष्‍यात एकाकीपण आले होते. पतीचे निधन होऊन बरेच वर्षे उलटून गेली होती. वृद्धेला मुलबाळही नसल्‍याने ती एकट्याने आपले उर्वरीत आयुष्‍य घालवित होती. ती आपल्‍या उपजीविकेसाठी शेतात छोटीमोठी कामे करीत असे. काम करून उरलेल्‍या वेळात ती देवाचे नामस्‍मरण करून आपला वेळ व्‍यतित करत असे. चारोधामची यात्रा करण्‍याची तिची मनापासूनची फार इच्‍छा होती. अनेक वर्षापासून तिने यात्रेसाठी पैसे साठविणे चालू केले होते. गावातील सर्वच लोकांना तिची इच्‍छा माहिती होती. शेवटी दीर्घ प्रतिक्षेनंतर तिच्‍याजवळ तीर्थयात्रेपुरते पैसे गोळा झाले. तिने सामानाची बांधाबांध सुरु केली. परंतु ज्‍या दिवशी गावाला जायचे होते नेमके त्‍याच्‍या आदल्‍या रात्री मोठा पाऊस झाला व गावातील नदीवरचा बंधारा फुटून सर्वच गावात पाणीच पाणी झाले. कोणाचे घर वाहून गेले तर कुणाचे आईवडील, कुणाचा नवरा तर कुणाची मुले, जनावरे, पैसाअडका, धान्‍य सारे काही वाहून गेले. गावापासून वृद्धेचे घर दूर असल्‍याने तिच्‍या घराकडे काही पाण्‍याचा प्रकोप जाणवला नाही. तिच्‍या घरातील सामानसुमान आणि पैसा सुरक्षित राहिले. परंतु गावावर असे संकट आलेले पाहून वृद्धेच्‍या डोळ्यात पाणी तरळले. तिचे मन तीर्थयात्रेसाठी धजावेना. तिने आपली सर्व रक्कम व घरातील सर्व धान्‍य जनकल्‍याणसाठी दान केली. गाव पूर्ववत सावरले गेले. गावाच्‍या मदतीसाठी तिने केलेल्‍या अथक परिश्रमामुळे ती आजारी पडली व त्‍यातच तिचे निधन झाले. गावानेही तिच्‍या सन्‍मानार्थ एक मोठा स्‍तंभ उभा करून तिचे आभार व्‍यक्त केले.
तात्‍पर्य : जनसेवा हीच ईश्‍वराची सेवा आहे.

54 सेवा हाच धर्म
एका पत्रकारांनी स्‍वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती. स्‍वामी विवेकानंदांना भेटून त्‍यांच्‍याकडून चार ज्ञानाच्‍या गोष्‍टी शिकाव्‍यात अशी त्‍यांची तीव्र इच्‍छा होती. त्‍या पत्रकारांचे दोन मित्र त्‍यांना भेटावयास आले व बोलता-बोलता स्‍वामी विवेकानंदांचा उल्‍लेख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्‍याचे ठरविले. तिघेही मिळून स्‍वामीजींकडे गेले. विवेकानंदांनी तिघांचीही आस्‍थेने विचारपूस केली. यादरम्‍यान स्‍वामीजींना असे कळाले की तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत. त्‍या काळात पंजाबात दुष्‍काळ पडलेला होता. त्‍यांनी त्‍यासंदर्भात चर्चा केली. दुष्‍काळग्रस्‍तांसाठी चाललेल्‍या मदतकार्याची माहिती घेतली. त्‍यानंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. ब-याच वेळ चर्चा झाल्‍यानंतर तिघेही निघाले. निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्‍हणाले,''स्‍वामीजी, आम्‍ही तुमच्‍याकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आले होतो. पण तुम्‍ही मात्र सामान्‍य अशा बाबींवरच चर्चा केलीत. आम्‍हाला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही.'' या स्‍वामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले ते असे की,'' मित्रवर्य, जोपर्यत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्‍यापेक्षा त्‍याची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्‍त महत्‍वाचे आहे. ज्‍याचे पोट भरलेले नाही त्‍याला धर्मोपदेश देण्‍यापेक्षा भाकरी देणे हे महत्‍वाचे आहे. रिकाम्‍या पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही.''

५५ अहंकाराचा त्‍याग
एका राजाला दोन मुले होती. मोठा अहंकारी आणि लोभी होता तर धाकटा परोपकारी होता. राजाच्‍या मृत्‍युनंतर त्‍याचा मोठा मुलगा गादीवर बसला. त्‍याने प्रजेवर खूप अन्‍याय, अत्‍याचार करणे सुरु केले पण छोटा सहृदयी असल्‍याने तो प्रजेमध्‍ये सुप्रसिद्ध होता. त्‍याने लोकांना गुपचुपपणे मदत केलेली एके दिवशी मोठ्या भावाला कळाली, मोठा भाऊ म्‍हणाला,'' मी राजा असताना तू माझ्या परवानगीशिवाय तू लोकांना मदत करत आहेस हे मला आवडत नाही.'' त्‍याचे बोलणे पूर्ण झाल्‍यावर छोटा म्‍हणाला,''मी माझे कर्तव्‍य करत आहे.'' तेव्‍हा मोठ्या भावाने त्‍याला एक जमिनीचा एक छोटा तुकडा दिला आणि महाल व राज्‍यावरील सर्व अधिकार काढून घेऊन त्‍याला राज्‍यातून हाकलून दिले. छोट्याने आदेशाचे पालन केले. तेथे त्‍याने स्‍वत:साठी खोली बांधली. त्‍यावर आंब्यांची रोपे लावून आमराई तयार केली. त्‍याची देखभाल केली. झाडाला लवकरच आंबे लागले. त्‍या मार्गाने कोणी जात असेल तर त्‍यांना तो आंबे खाऊ घालत असे. उपाशी वाटसरूंच्‍या या निस्‍वार्थ सेवेमुळे त्‍याची लोकप्रियता पुन्‍हा वाढली. अहंकारी राजाने त्‍याचे बघून तशीच आमराई तयार केली पण काही केल्‍या त्‍याच्‍या आंब्यांच्‍या झाडांना आंबेच लागेनात. त्‍याने संतमहात्‍मे, जाणकारांना विचारले तेव्‍हा एका संताने त्‍याला सांगितले की, त्‍या झाडांनासुद्धा परोपकाराची भाषा कळते म्‍हणूनच त्‍याच्‍या झाडांना आंबे लागतात. तुझ्या झाडांवर अहंकाराची छाया आहे तू परोपकाराची जोड दे मग आंब्यांनी तुझे झाड बहरेल. राजाने संताच्‍या बोलण्‍याप्रमाणे अहंकार सोडून देऊन सदाचाराचा मार्ग पत्‍करला.
तात्‍पर्य : परोपकार केल्‍यानेच मनुष्‍यजन्‍म सफल होणार आहे.

५६ मनाचा मोठेपणा
नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यार्थिदशेत असतानाची गोष्‍ट. अभ्‍यासात हुशार असणा-या या मुलाकडे त्‍यांची आई विशेष लक्ष देत असे. एकदा मुलासाठी दूध घेऊन त्‍या सुभाषचंद्रांच्‍या अभ्‍यासिकेत आल्‍या तेव्‍हा ते तेथे नव्‍हते. अचानक हा मुलगा कोठे गेला असेल याचे आईला आश्‍चर्य वाटले. तितक्‍यात त्‍यांना सुभाषच्‍या टेबलापासून पुस्‍तकांच्‍या कपाटापर्यंत मुंग्‍यांची रांग लागलेली दिसली. इतक्‍या स्‍वच्‍छ खोलीत मुंग्‍यांची रांग कशामुळे लागली असाही प्रश्‍न त्‍यांना पडला. त्‍यांनी कपाट उघडले तेव्‍हा त्‍यात गोड पोळ्या पुस्‍तकांच्‍या मागे दडवून ठेवलेल्‍या दिसल्‍या. आईने त्‍या मुंग्‍या लागलेल्‍या पोळ्या खिडकीतून बाहेर फेकल्‍या इतक्‍यात सुभाष खोलीत आला. त्‍यांनी आईला विचारले,''तू असे का केलेस आई?'' आईने मुंग्‍यांची रांग दाखवून विचारले की, सुभाष तू या पोळ्या का कपाटात दडवून ठेवल्‍या आहेस. सुभाषचे डोळे पाणावले व तो म्‍हणाला,'' आई, तू पोळ्या फेकल्‍या हे चांगले केलेस कारण रोजच मी दोन पोळ्या अशा दडवून ठेवत असे. या दोन पोळ्या मी शाळेच्‍या रस्‍त्‍यावर राहणा-या एका गरीब भिकारणीला देत होतो. काल तिची व माझी भेट झाली नाही आणि आताच मला समजले की आज ती मरण पावली. तिला पोळी देऊन मी तिची मदत करत होतो.'' सुभाषचंद्रांच्‍या मनातील गरीबांबाबतची उदात्त भावना पाहून आईचेही डोळे भरून आले व तिने सुभाषबाबूंना आपल्‍या कुशीत घेतले.
तात्‍पर्य : गरीबांना मदत करणे म्‍हणजे गरीबांवर उपकार करणे असे नव्‍हे तर त्‍यांच्‍या उपजीविकेपुरते सहाय्य करणे.

५७ प्रामाणिकपणा
एका राज्‍यावर एक सम्राट राज्‍य करत होता. एक न्‍यायी, उदार व प्रामाणिक सम्राट म्‍हणून त्‍याची ख्‍याती होती. प्रजेच्‍या समस्‍या सातत्‍याने जाणून घेऊन त्‍यावर त्‍वरीत उपाययोजना करण्‍यासाठी तो प्रसिद्ध होता. कोणी जर कामात कसूर करत असेल तर त्‍याला योग्‍य ती सजा देण्‍यासही तो कमी पडत नसे. राज्‍यकारभार मोठ्या कुशलतेने करत असल्‍याने त्‍याची ख्‍याती दूरदूरच्‍या देशात पसरली होती. अनेक देशातील लोक त्‍याची कीर्ती ऐकून भेटण्‍यास येत असत. एकदा त्‍याच्‍या देशाला भेट देण्‍यासाठी चिनी लोकांचे शिष्‍टमंडळ आले होते. भेट देण्‍याचा बहाणा असला तरी मुख्‍य कारण हे सम्राटाला भेटणे हेच होते. पण ती मंडळी राज्‍याच्‍या सीमेवर आली असताना मोठ्याप्रमाणावर हिमवृष्‍टी झाली. इतके भयानक वादळ होते की एकही चिनी प्रवासी वाचला नाही. वादळाने सर्वच्‍या सर्व चिनी प्रवाशांचे प्राण घेतले. सम्राटाची भेट घेण्‍याचे मनात ठरवून आलेल्‍या सर्व प्रवाशांना मृत्‍यूची मात्र भेट झाली. त्‍यांचे सामानसुमान सर्व त्‍याच्‍या मृतदेहापाशीच पडून राहिले. त्‍यात राजाला भेट देण्‍यासाठी आणलेली संपत्तीही होती. तसेच या देशातून विविध वस्‍तू खरेदी करण्‍यासाठी आणलेले धन ही होते. सम्राटाला जेव्‍हा ही बातमी समजली तेव्‍हा त्‍याने तात्‍काळ आपल्‍या काही सैनिकांना चिनी यात्रेकरूंच्‍या सामानाची सुरक्षा करण्‍यासाठी तैनात केले. राज्‍यकर्ता या नात्‍याने तो त्‍यांची संपत्ती जप्‍त करून राजकोशात टाकू शकला असता पण त्‍याने तसे केले नाही. सम्राटाने चीन देशात यात्रेकरूंच्‍या मृत्‍यूची वार्ता कळविली. चीनमधून प्रवाशांचे नातेवाईक राज्‍यात आले तेव्‍हा त्‍या प्रवाशांची संपत्ती नातेवाईकांकडे राजाने सुपूर्त केली.
तात्‍पर्य : दुस-याच्‍या वस्‍तूची सुरक्षा आपल्‍या सामानासारखी करणे आणि ते व्‍यवस्थितपणे ज्‍याचे त्‍याला परत करणे हा खरा प्रामाणिकपणा.

५८ इच्‍छाशक्ती
अमेरिकेत एका विद्यालयात एक अपंग मुलगी शिकत होती. वर्गातील सर्व मुले तिला तिच्‍या अपंगात्‍वावरून चिडवत असत पण त्‍या सर्वांकडे दुर्लक्ष करून ती मुलगी आपल्‍या अभ्‍यासाकडे लक्ष देत असे. एकदा एक शिक्षक ऑलिम्पिक खेळाविषयी मुलांना सांगत होते. त्‍या मुलीने तो विषय लक्षपूर्वक ऐकला आणि त्‍या खेळाविषयी काही शंका शिक्षकांना विचारल्‍या, त्‍यावर शिक्षकांनी तिला उपहासाने म्‍हटले,’’मुली, तुला तर धड स्‍वत:च्‍या पायाने नीट चालताही येत नाही मग ऑलिम्पिकसारख्‍या खेळाची आणि त्‍यातील खेळाडूंची माहिती घेऊन तुला काय उपयोग आहे?’’ शिक्षकांचे बोलणे ऐकून मग मुलेही मग तिला चिडवू लागली. दुस-या दिवशी बोलताना त्‍या शिक्षकांनी पुन्‍हा तिच्‍या अपंगात्‍वावर टोमणा मारला तेव्‍हा तिने आपल्‍या कुबड्या उचलल्‍या आणि म्‍हणाली,’’सर आज मी अपंग आहे, चालू शकत नाही पण लक्षात ठेवा, मनात ठाम निश्‍चय केला तर अशक्य असे काहीच नसते. मी एक दिवस तुम्‍हाला आकाशात उंच उडून दाखवेन.’’ त्‍या दिवसानंतर मुलीने चालण्‍याचा व्‍यायाम केला. काही कालावधीनंतर ती चालू-फिरू लागली आणि नंतर ती मुलगी धावू लागली. 1960 च्‍या ऑलिम्पिकमध्‍ये धावण्‍याच्‍या स्‍पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले. त्‍या अपंग मुलीचे नाव म्‍हणजेच विल्‍मा गोल्डिन रुडाल्‍फ. अपंग मुलीच्‍या या जिद्दीला संपूर्ण जगाने सलामी दिली.
तात्‍पर्य :- दृढ इच्‍छाशक्ती असेल तर कठीण उद्दिष्‍टप्राप्तीसाठीचा मार्ग सोपा असतो.

५९ शिकवण
एक महात्‍मा होते. त्‍यांना कोणीही रागावलेले पाहिले नव्‍हते. ते सर्वांना हसतमुखाने भेटत असत. कोणत्‍याही परिस्थितीत ते चिडत नसत. त्‍यांच्‍या कुटीजवळच एक रागीट माणूस राहत होता. जेव्‍हाही तो महात्‍म्‍यास शांत व हसतमुख पाहत असे तेव्‍हा त्‍या माणसाचा जळफळाट व्‍हायचा. तो रागाने बेभान होत असे. एकदा त्‍याने महात्‍म्‍याची परीक्षा घेण्‍याचे ठरविले. त्‍याने महात्‍म्‍यास जेवण्‍यास बोलावले. महात्‍मा वेळेवर त्‍याच्‍या घरी पोहोचले तर तो दुष्‍ट माणूस त्‍यांना म्‍हणाला,’’अरे तुम्‍ही इतक्‍या उशीरा कसे काय आलात. जेवण तर संपले.आता पुन्‍हा कधीतरी या’’ महात्‍मा म्‍हणाले,’’ठीक आहे.’’ ते परत जाऊ लागले तेव्‍हा त्‍या दुष्‍टाने त्‍यांना परत बोलावणे केले व म्‍हणाला,’’ तुमच्‍यासारख्‍या अधाशी साधूला मी जेवण देत नसतो, जे तुमचा आदरसत्‍कार करतात ते लोक मूर्ख असतील असे त्‍याने सुनावले.’’ महात्‍मा इतके सगळे ऐकूनही शांतच होते. दुष्‍टाचे बोलणे पूर्ण झाल्‍यावर महात्‍मा तेथून निघाले असता परत दुष्‍टाने त्‍यांना बोलावले व म्‍हणाला,’’ भिकारड्या तू असा इथून जाणार नाहीस म्‍हणून सांगतो. अन्न काही शिल्लक नाही माझ्या घरी काही दगड शिल्‍लक आहेत, ते खा आणि तुझे पोट भर’’ महात्‍मा शांतपणे म्‍हणाले,’’बंधू, दगड ही काही खायची गोष्‍ट नाही. तुला काही द्यायचे नसेल तर देऊ नकोस’’ इतके बोलून ते पुन्‍हा निघाले. दुष्‍टाला आता आपली चूक कळून आली. त्‍याचे महात्‍म्‍याचे पाय धरले व रडू लागला असता. महात्‍म्‍याने त्‍याला हृदयाशी धरले व उदार अंतकरणाने क्षमा केली. या प्रसंगानंतर तो दुष्‍ट माणूस सज्जन बनला.
तात्‍पर्य :- वाईटाशी सामना करताना प्रत्‍येक वेळेस वाईट बनलेच पाहिजे असे नाही तर काही वेळेस चांगले राहूनही वाईट गोष्‍टींशी सामना करता येतो.

६० दुस-यांचा विचार करा
शहरापासून दूर एका घनदाट जंगलात एक आंब्याचे आणि लिंबाचे झाड होते. दोन्‍ही झाडे शेजारशेजारी होती पण शेजारी असूनही लिंबाचे झाड कधीही आंब्याच्‍या झाडाशी बोलत नसे. कारण आंब्याच्‍या झाडापेक्षा आपण उंच असल्‍याचा त्‍याला गर्व होता. एकदा काय झाले की, एक मधमाशांची राणी लिंबाच्‍या झाडापाशी गेली व ती लिंबाला म्‍हणाली,''वृक्षदेवा, मी तुमच्‍या इथे मधाचे पोळे बनवू इच्छिते, तुम्‍ही मला याची परवानगी द्या.'' लिंबाचे झाड तिला म्‍हणाले,''नाही मी अशी मधाची पोळी वगैरे काही बनवू देणार नाही'' हे सर्व ऐकून आंब्याचे झाड लिंबाला म्‍हणाले,''अरे मित्रा, तू तुझ्यावर पोळे का बरे बनवू देत नाहीस कारण तुझ्यावर ते अतिशय सुरक्षित असेल.'' पण लिंबाचे झाड हटून बसले होते की ते मधाचे पोळे बनवू देणार नाही म्‍हणून. राणी मधमाशीने वारंवार विनंती करूनही लिंबाचे मन काही वळेना तेव्‍हा राणीने आंब्याच्‍या झाडाला फक्त एकदाच विनंती केली त्‍याबरोबर आंब्याच्‍या झाडाने परवानगी दिली. राणी मधमाशीने व तिच्‍या सहका-यांनी तिथे एक पोळे तयार केले व सुखाने तेथे त्‍या राहू लागल्‍या. काही दिवसांनी तिथे काही माणसे आली व त्‍यांनी झाडे तोडण्‍याचे ठरविले. सुरुवातीला आंब्याचे झाड तोडायचे ठरले पण त्‍यांच्‍यातील एकाची नजर मधमाशीच्‍या पोळ्यावर गेली. त्‍यांनी मधमाशांना घाबरूनच ते तोडायचे टाळले पण शेजारील लिंबाचे झाड मात्र त्‍यांना सुरक्षित वाटले. कारण त्‍याच्‍यावर ना पोळे होते व त्‍याचे लाकूडही ब-यापैकी चांगले मिळणार होते. त्‍यांचे हे संभाषण लिंबाने ऐकले व तो घाबरून गेला पण तो काहीच करू शकत नव्‍हता. दुस-या दिवशी परत तेच लोक आले व झाडाला कापू लागले तेव्‍हा लिंब ओरडू लागला,'' अरे कुणीतरी मला वाचवा नाहीतर हे लोक मला कापून टाकतील.'' तेव्‍हा मधमाशांनी त्‍या माणसांवर हल्ला केला व माणसांना पळवून लावले. लिंबाच्‍या झाडाने मधमाशांचे व त्‍यांच्‍या राणीचे आभार मानताच त्‍या म्‍हणाल्‍या,''आभार जर मानायचे असतील तर आंब्याच्‍या झाडाचे माना कारण त्‍याच्‍या परवानगीनेच आम्‍ही येथे मधाचे पोळे तयार करू शकलो व लिंबवृक्षा आम्‍ही तुला वाचवू शकलो. आंब्याच्‍या झाडानेच आम्‍हाला तुला वाचविण्‍यासाठी सांगितले होते.''
तात्‍पर्य :- कधी कधी मोठेपणा आणि महान असल्‍याचा अभिमानच आपल्‍याला घमेंडी आणि क्रूर बनवतो ज्‍यामुळे आपण आपल्‍या सच्‍च्‍या मित्रांपासून दूर होत जातो.

६१ स्‍वावलंबन
एक माणूस कामासाठी दुस-या शहरात गेला. प्रवासात त्‍याची काही लोकांशी ओळख झाली. तेही कामानिमित्ताने त्‍याच शहरात चालले होते. त्‍यांच्‍यापैकी काहीजण पायी तर काही घोड्यावर स्‍वार होते. बोलत चालले असताना एका घोडेस्‍वाराच्‍या हातून चाबूक खाली पडला. त्‍या व्‍यक्तिने त्‍या घोडेस्‍वारास खाली उतरू न देता, चाबूक देण्‍याची तयारी दर्शविली पण त्‍या सहका-यास नम्रपणे नकार देत स्‍वत: खाली उतरून त्‍या घोडेस्‍वाराने चाबूक स्‍वत:च हातात घेतला. खालून मदत करणा-या व्‍यक्तिने याचे कारण घोडेस्‍वारास विचारले असता घोडेस्‍वार उत्तरला,''आपण ज्‍यावेळी घोड्यावर बसतो तेव्‍हा चाबूक आपणच सांभाळावा लागतो. आपण प्रत्‍येक गोष्‍टीत स्‍वयंपूर्ण राहिलो तरच आपल्‍याला यशाची खात्री आहे असे समजावे.''
तात्‍पर्य :- कुणावरही विसंबून न राहता स्‍वावलंबनाचा स्‍वीकार केल्‍याने यश मिळतेच.

६२ 'मी'' पणाचा त्‍याग
एकदा एक नागपाल नावाचा प्रवासी विविध देशांना भेटी देण्‍याच्‍या दृष्‍टीने बाहेर पडला होता. दूरदूरची ठिकाणे जवळून पाहावीत, त्‍याची माहिती जाणून घ्‍यावी अशी त्‍याची इच्‍छा होती. त्‍यामुळे त्‍याने बरोबर कोणालाही घेतले नाही. एकट्यानेच तो सर्व प्रवास करत होता. अनेक दिवस त्‍याचा प्रवास चालूच होता. दिवसभर चालायचे आणि रात्री एखाद्या ठिकाणी मुक्काम करायचा असा त्‍याचा नियम होता. एकदा प्रवासात त्‍याला वेळेचे भानच राहिले नाही व चालत जात असताना रात्र झाली. तेव्‍हा त्‍याच्‍या लक्षात आले की गाव मागेच राहिले आहे आणि आता आपण जंगलात आहोत. जंगली श्‍वापदांचे आवाज ऐकू येऊ लागले व त्‍याला भीतीच वाटू लागली. थोडे अंतर तशाच भीतीच्‍या वातावरणात चालत होता. पुढे गेल्‍यावर त्‍याला एका झोपडीतून कंदीलाचा प्रकाश दिसून आला. त्‍या प्रकाशाच्‍या रोखाने तो चालत गेला व पाहिले तर झोपडीचे दार बंद होते. नागपालने झोपडीजवळ उभे राहून हाक मारली. आतून आवाज आला,''कोण आहे'' नागपालने उत्तर दिले,'' मी आहे'' त्‍यानंतरही झोपडीचे दार उघडले गेले नाही. त्‍याने परत आवाज दिला, परत तोच प्रश्‍न आला व नागपालने यावेळीही ''मी आहे'' असे उत्तर दिले. पुन्‍हा झोपडीचे दार बंदच राहिले. असे चारपाचवेळेला झाल्‍यावर नागपालने पुन्‍हा दार ठोठावले तेव्‍हा आतून पुन्‍हा कोण आहे असे विचारताच त्‍याने ''दारात नागपाल नावाचा प्रवासी उभा असून रात्रभरासाठी विश्रांती द्यावी अशी विनंती करतो'' असे उत्तर देताच झोपडीचे दार पटकन उघडले गेले. झोपडीत एक साधूमहाराज राहात होते. त्‍यांनी नागपालला आत घेतले व सांगितले,''मित्रा या झोपडीत ''मी''पणाला स्‍थान नाही. माझप्रवासी आहेस तर आरामात राहा.''
तात्‍पर्य – ''मी'' पणाला कोठेही स्‍थान नसावे.

६३ मोठेपणा
एका जंगलात एक कोल्‍हा राहत होता. कोल्‍हा एकदा खड्डयात पडल्‍याने तो लंगडा झाला. त्‍याला शिकार मिळेनाशी झाली. उपासमारीने तो वैतागुन गेला व एकदा तो जंगलाच्‍या राजास भेटण्‍यास गेला. त्‍याने राजास विनंती केली की मला तुमचा सेवक म्‍हणून ठेवून घ्‍या. तुमचे उष्‍टे खाऊन माझे पोट भरतो. सिंहाला त्‍याची दया आली. सिंह म्‍हणाला,''कोल्‍ह्या तू समोरच्‍या शिळेवर उभे राहून जंगलात लक्ष ठेवायचे. एखादा प्राणी दिसला की जोरात ओरडायचे. पूर्ण ताकदीनिशी तुटून पडा जंगलचे राजे सिंहमहाराज'' कोल्‍हा या गोष्‍टीला तयार झाला. कोल्‍हा रोज सूचना देत होता आणि सिंह शिकार करायचा. काही काळ निघून गेला व कोल्‍ह्याला वाटू लागले की मी जोराने ओरडतो म्‍हणूनच सिंह शिकार करू शकतो. माझ्या ओरडण्‍यातच काहीतरी जादू आहे ज्‍यामुळे सिंह अन्न मिळवू शकतो. त्‍याने ही शंका सिंहाच्‍या कानावर घातली व म्‍हणाला,'' सिंहमहाराज, आता इथून पुढे तुम्‍ही शिळेवर उभे राहून डरकाळी फोडायची व ओरडायचे की पूर्ण ताकदीने तुटून पडा कोल्‍हे राजे'' तुम्‍ही असे ओरडताच मी त्‍या प्राण्‍यावर हल्ला करेन व त्‍याला ठार मारेन. सिंहाने या गोष्‍टीवर सहमत न होता त्‍याला समजावून सांगण्‍याचा प्रयत्‍न केला पण कोल्‍हा हट्ट धरून बसला. शेवटी सिंह शिळेवर जाऊन उभा राहिला व डरकाळी फोडली. कोल्‍ह्यानेही मग अंगात फार ताकद असल्‍यासारखे शिकार काय आहे न पाहताच हल्ला केला. पण सावज हे लहानसहान प्राणी नव्‍हता तर तो एक हत्ती होता. हत्तीच्‍या अंगावर कोल्‍ह्याने उडी मारताच हत्तीने त्‍याला सोंडेत धरून लांब फेकून दिले. कोल्‍हा एका मोठ्या खडकावर आपटून मरून गेला.
तात्‍पर्य :-मोठ्यांचे मोठेपण हे त्‍यांच्‍या कृतीत असते. असे मोठेपण मिळविण्‍यासाठी व टिकविण्‍यासाठी सुद्धा स्‍वत:च्‍या अंगी काही तरी अक्कल असावी लागते.

६४ ओळख
खूप दिवसांपूर्वीची गोष्‍ट आहे, दहा मुलांची एकमेकांशी अतिशय चांगली मैत्री होती. ते सर्वजण एकत्र राहत होते व एकत्रच खात, पित व बहुतांश वेळ सोबतच राहत होते. एकदा त्‍यांनी सर्वांनी मिळून एकत्र प्रवासाचा बेत ठरविला. ठिकाणही ठरले, सगळेजण आपापल्‍या वेगाने प्रवास करत होते. कोणी वेगाने पुढे जात होता तर कोणी संथ गतीने पुढे जात होता. मागे-पुढे जात होते पण ठिकाण ठरलेले असल्‍याने सगळे जण मुक्कामी पोहोचले. सगळे तेथे पोहोचल्‍यावर तेव्‍हा त्‍यांनी विचार केला आपला ग्रुप तरी मोजून घ्‍यावा. न जाणो कोणी तरी मागे तर राहिला नसेल. एका मुलाने सगळ्यांना रांगेमध्‍ये उभे करून मोजण्‍यास सुरुवात केली. त्‍याने मोजले व म्‍हणाला,''आपण तर नऊच जण आहोत. मग दहावा जण कुठे गेला'' दुसरा मुलगा म्‍हणाला थांब मी मोजतो. त्‍यानेही मोजले तर नऊच जण निघाले. सगळ्यांच्‍या चेह-यावर उदासी निर्माण झाली. कारण एकजण कुणीतरी त्‍यांच्‍यातून हरवला गेला होता व आता तो त्‍यांना कधीच भेटणार नव्‍हता. सगळे मलूल चेहरा करून शांतपणे बसून राहिले. त्‍यांना अन्नपाणी घेण्‍याचेही सुचेना इतक्‍यात तेथून एक महात्‍मा जात होते. त्‍याने या उदास बसलेल्‍या मुलांना पाहिले व त्‍यांना त्‍यांची दया आली. त्‍यांनी मुलांना उदासीचे कारण विचारले असता मुलांनी एकजण हरवला असल्‍याचे सांगितले. त्‍या महात्‍म्याला त्‍यांची अडचण समजली व ते म्‍हणाले, मी तुम्‍हाला तुमचा हरवलेला मित्र शोधून देतो. त्‍याने सर्वांना रांगेत उभे करून मोजले तेव्‍हा ते दहाजण होते. त्‍या मुलांना त्‍यांचा दहावा मित्र सापडला होता. त्‍यांनी त्‍या महात्‍म्‍याचे आभार मानले व दहावा मित्र कसा काय शोधला हे विचारले असता महात्‍मा म्‍हणाले,'' अरे मित्रांनो तुम्‍ही तुमच्‍यापासून कधी मोजायची सुरुवातच केली नाही. तुम्‍ही कायम दुस-यापासून मोजायची सुरुवात करत असल्‍याने तुम्‍हाला तुमचे अस्तित्‍वच कधी जाणवले नाही व यामुळे तुमचा एक मित्र म्‍हणजे तुम्‍ही स्‍वत:लाच मुकत गेलात. हा हिशेब तुमच्‍या लक्षात न आल्‍याने तुम्‍ही जगातला एक सर्वोच्‍च मित्र गमावित होता.''
तात्‍पर्य : आपणही स्‍वत:ला विसरून दुस-याकडेच लक्ष देतो. याच कारणामुळे जग स्‍पष्‍ट दिसत नाही. प्रथमत: आपण स्‍वत:ला ओळखले पाहिजे मग जगाची आपोआपच ओळख होते.

६५ आत्‍मनियंत्रणाचे महत्‍व
एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्‍ट शिकण्‍यास तयार होत असे. त्‍याने धनुष्‍यबाण तयार करण्‍यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्‍याच्‍यात अहंकार आला, तो आपल्‍या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्‍य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्‍यांनी जेव्‍हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्‍हा त्‍यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्‍यावी जी आतापर्यंतच्‍या कलांमध्‍ये श्रेष्‍ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्‍याच्‍याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्‍ही कोण आहात. बुद्ध म्‍हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्‍यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्‍हणाले,''जो धनुष्‍यबाण वापरतो त्‍याला त्‍याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्‍याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्‍वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्‍हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्‍यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्‍य तर स्‍वत:ला नियंत्रणात ठेवण्‍याचे असते.
तात्‍पर्य :- ज्‍यांना स्‍वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्‍याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परि‍स्थितीत आपल्‍याला आनंदी ठेवतो.

बोधप्रद कथा

बोधप्रद कथा
परीस
     एक माणूस परीस(पारस) शोधायला निघाला. त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. दिवस गेले. महिने लोटले. वर्षे सरली. पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही .तो दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा. शेवटी तो माणूस म्हातारा झाला. आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता. त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले. ती साखळी सोन्याची झाली होती. दगड घ्यायचा, साखळीला लावायचा व फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही.
तात्पर्य:
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो. कधी आई- वडिलांच्या रूपाने, कधी भाऊ-बहीनीच्या नात्याने, कधी मित्र-मैत्रिणीच्या नात्याने, तर कधी प्रेयसीच्या नात्याने. कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो. आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो.
*********************************************************************
जिद्द
प्राचीनकाळी आश्रमात शिक्षण दिले जाई. शिष्यांना गुरुजीची सेवा करावी लागे, वेळ्प्रसंगी गुरुजी शिष्यांना शिक्षा करीत.असेच एकदा शिष्यांनी योग्य पाठांतर केले नाही म्हणून गुरुजी त्यांना छ्ड्या मारीत होते.शिष्य छ्ड्या खाऊन मुकाट्याने खाली बसत.एवढ्यात एका शिष्यांने हात वर केला.गुरुजी चमकले व म्हणाले “अरे तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही, तुला मारुन काय उपयोग.” शिष्याला मोठा अपमान वाटला.त्याने मनोमन ठरविले “मी माझ्या हातावर विद्येची रेषा खेचून आणेल.”त्याने अपार कष्ट घेऊन विद्या सपांदन केली.एवढेच नव्हे तर तो एक महानव्याकरणकार झाला.तो म्हणजेच संस्कृतचा महान व्याकरणकार ‘पाणिनी’ !
तात्पर्य :-
ज्ञान मिळवण्यासाठी स्वत: चिंतन, मनन, अभ्यास व अपार कष्ट् करावे लागतात.
Self Study is Supreme Study.
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ                            
एक शेतकरी आपल्या शेतात मध तयार करीत असे. एकदा एका अस्वल कुंपण तोडून शेतात आले व पोळ्यातील मधा खाऊ लागले.त्याचबरोबर पोळ्यातील मधमाश्यांनी एकदम हल्ला चढविला पण अस्वलाची कातडी जाड असल्याने मधमाश्याचे काही चालले नाही. नंतर मधमाश्यांनी युक्ती लढवून त्याच्या नाकावर आणि डोळ्यावर हल्ला केला, त्यामुळे अस्वलाला खाज सुटली त्रासून तो आपले नाक व डोळे ओरबाडू लागला.आणि त्याचेच नखांनी तो रक्तबंबाळ झाला.
तात्पर्य :- शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.
**********************************************************************
काळ
एका झाडाच्या ढोलीत काही धनगरांनी आपली भाजी भाकरी ठेवली होती. एका भुकेल्या कोल्ह्याने ती पाहीली आणि आत शिरुन त्याने ती खाऊन टाकली. पण पोट मोठे झाल्याने त्याला ढोलीतून बाहेर पडता येईना.त्याचे रडणे-ओरडणे ऐकून जवळून जाणारा दुसरा कोल्हा जवळ आला.व विचारू लागला.सर्व हकीकत कळल्यावरतो म्हणाला “अस्स, मग आता आत जातांना जितका बारीक होतास तितका होईपर्यंत आतच रहा.मग तुला सह्ज बाहेर पडता येईल.”
तात्पर्य :-
काही कठीण समस्या केवळ काळानेच सुटू शकतात.
*********************************************************************
प्रयत्नांची मर्यादा
एका शिकारी कुत्र्याने एका सशाचा पाठलाग सुरू केला. पण अखेर ससा पळून जाण्यात यशस्वी झाला. हे पाहून कुत्र्याच्या मालकाने त्याला विचारले, ‘एका सशाने तुला हरवावे ?’ यावर कुत्रा म्हणाला, “ धनी माझे धावणे हे पोटासाठी शिकार मिळविण्यासाठी होते, तर त्या सशाचे धावणे हे स्वःताचा जीव वाचवण्यासाठी होते.तेंव्हा त्याची गती माझ्या गतीपेक्षा अधिक असणे साहजिकच नाही का ? ”
तात्पर्य :-
जीवावर बेतते तेव्हा स्वःताला वाचविण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांना मर्यादा नसते.
उपकार
                                एका गावात एक श्रीमंत माणूस राहात होता. तो कधीच दानधर्म करीत नसे पण लोक त्याला ‘देशभक्त’ मानत असत. एकदा तो देवाचे दर्शनासाठी गेला. स्वच्छ हातपाय धुवून दर्शन घ्यावे म्हणून तो नदीवर गेला. हात पाय धुता धुता पाय घसरुन पाण्यात पडला व गटांगळ्या खाऊ लागला. त्याला बाहेर काढण्यास कोणाचाच धीर होईना. तेवढ्यात एका साधूचे त्याचेकडे लक्ष गेले. साधूने त्याला सुखरुप पाण्याबाहेर काढले. साधूला देण्यासाठी त्याने खिशातून खूप पैसे बाहेर काढले पण दिली एक पावली. हे बघून काठांवरच्या लोकांना खूप राग आला.एकाने तर त्याला उचलून पाण्याजवळ नेले व पाण्यात फेकून देऊ लागला हे पाहून साधू म्हणाला “त्याला पुन्हा पाण्यात ढकलू नका, लोकांनो त्याने स्वःताच्या किंमतीप्रमाणे बक्षीस देण्यासाठी पावली बाहेर काढली.आता गावात त्याला एवढीच किंमत मिळेल. हे ऐकूताच श्रीमंत माणूस खजील झाला.
तात्पर्य:-
उपकार कर्त्याचे उपकार स्मरणे हे आपले परम कर्तव्य आहे.
*******************************************************************
धनाचा विनियोग
               एकदा एक कोल्हा जमिनीत बीळ खणत असताना खूपच खोल खणत गेला. खूप खोल गेल्यावर त्याला तिथे एक धनाचा हंडा दिसला व त्यावर एक वृद्ध नाग त्या धनाचे रक्षण करत होता. कोल्ह्याने नागाला विचारले,”हे नागदेवता, तुम्ही इथे काय करता आहात.” नाग म्हणाला,” माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्या धनाचे मी रक्षण करत आहे.” मग कोल्हा पुन्हा म्हणाला, ” पण इथं इतकं मोठं धन असताना तुम्ही कधी त्याचा उपभोग घेतला आहे किंवा नाही.  उपभोग सोडा थोडं फार धन दानापोटी तरी खर्च केलंत काय?” नाग म्हणाला,” कसं शक्य आहे ? हे धन कमी होऊ नये म्हणून तर मी स्वत: या धनाचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे. त्याचा उपभोग घेणे किंवा दुसयाला दान देणे ह्या पेक्षा या धनाचे रक्षण करण्यातच मला जास्त आनंद आहे.” हे ऐकून कोल्हा नागाला म्हणाला,” मग नागदेवा, तुमच्या असल्या या श्रीमंतीपेक्षा मी गरीब आहे तोच बरा.ज्या धनाचा उपभोग घेतला जात नाही व ज्यातून दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग”
तात्पर्य –
ज्या धनाचा योग्य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्या धनाचा मनुष्य मात्राला काहीच फायदा नाही.
सिंह आणि लांडगा
एक सिंह आणि लांडगा असे दोघे वनातून फिरत असताना त्यांच्या कानी काही मेंढ़यांचा आवाज आला. तो आवाज ऐकून मोठ्या बढाईने लांडगा सिंहाला म्हणाला,”महाराज, तुम्ही आता चालून चालून दमला असाल, तेव्हा तुम्ही इथेच बसा. मी तुमच्यासाठी दोन-चार मेंढ्या मारून आणतो. याप्रमाणे बोलून लांडगा मेंढ्यांच्या आवाजाच्या रोखाने गेला असता त्याला त्या मेंढ्यांच्या कळपाजवळ मेंढ्यांचा धष्टपुष्ट मालक आणि चार शिकारी कुत्रे असल्याचे दिसले. त्याबरोबर तो लांडगा परत पावली सिंहाकडे आला व म्हणाला, ” महाराज तुम्ही तर या जंगलाचे राजे आहात आणि तिकडे उभ्या असलेल्या मेंढ्या रोगट आणि अशक्त आहेत.इतक्या सा-या मेंढयामध्ये एकही मेंढी चांगली नाही तेव्हा आपण दुसरी कोणती तरी शिकार करणेच बरे होईल.” सिंहानेही शिकारी कुत्र्यांचा आवाज ऐकला होता त्यामुळे सिंहाला लांडग्याचा धूर्तपणा लक्षात आला.
तात्पर्य – आपली असहाय्यता लपविण्यासाठी काहीना काही सबबी पुढे करणे हा प्राणीमात्रांचा स्वभाव आहे,
  ******************************************************************
मुर्खांचे निष्कर्ष
एका खगोल शास्त्रज्ञाने दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण केले. त्याला निरीक्षणातून असे कळून आले की सूर्यावर प्रचंड मोठा प्राणी आहे व आपण खूप मोठा शोध लावला.या समजूतीने तो लोकांना जमवून त्या शोधाची माहिती सांगू लागला की ”सूर्य प्रचंड उष्ण तारा असूनही त्यावर एक प्राणी जीवंत राहतो आणि तुम्ही सगळे आता घाबरून राहा जर तो प्राणी पृथ्वीवर आला तर पृथ्वीचे काय होईल हे पहा.” खगोल शास्त्रज्ञाच्या या बोलण्यावर काही लोकांचा खरेच विश्वास बसला व त्यांच्यापैकी काही लोकांनी त्याचा सत्कार करण्याचे ठरविले.पण जमलेल्या काही लोकांपैकी एकजण चिकित्सक होता त्याने त्या ज्योतिष्याची दुर्बिण तपासायचे ठरविले व ती तपासली असता त्याच्या लक्षात आले की महाकाय प्राणी हा सूर्यावर नसून एकमाशी दुर्बिणीच्या काचेवर अडकून पडली आहे आणि सूर्याकडे पाहताना ती माशी म्हणजे महाकाय प्राणी असल्याचा भास होत होता. चिकित्सक माणसानेही गोष्ट लोकांना सांगताच त्यांना शास्त्रज्ञाचा मूर्खपणा लक्षात आला.
तात्पर्य :-  मूर्खपणामुळे कधी ना कधी तोंडावर आपटावे लागते.
ज्योतिषी
अवंती नगरीचे राजा बाहुबली यांना राज ज्योतिष्याची गरज होती. मंत्रि परिषदेसमोर त्यांनी ही इच्छा व्यक्त केली.  राज ज्योतिषाबाबत घोषणा केली जावी आणि पात्र व्यक्तिला निरखुन पारखून नियुक्त केले जावे अशी सर्व मंत्रिगणांनी सर्व सहमतीने ठरवले. या पदासाठी पात्र उमेदवारांनी मुलाखती द्याव्यात अशी दवंडी दुस-या दिवशी राज्यात पिटवण्यात आली. सर्व उमेदवार ठरलेल्या वेळी दरबारात उपस्थित झाले. राजाने स्वत:च मुलाखती घेण्यास सुरुवात केली. अनेक ज्योतिष्यांनी आपल्या ज्ञानाचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली परंतु राजाचे समाधान झाले नाही. अखेरीस तीन ज्योतिषी उरले त्यातील पहिल्या ज्योतिष्याला राजाने विचारले,”तुम्ही भविष्य कसे सांगता” ज्योतिषी म्हणाला,”नक्षत्रपाहून” राजाने दुस-या ज्योतिष्याला हाच प्रश्न विचारला तेव्हा दुसरा ज्योतिषी म्हणाला,”हस्तरेषा पाहून भविष्य सांगतो” राजाला कुणाचीच उत्तरे आवडली नाहीत. अचानक राजाला तेव्हा आपल्या राज्यातील निर्धन ज्योतिषी विष्णु शर्माची आठवण झाली. विष्णु शर्माला तात्काळ बोलावण्यात आले. राजाने विष्णु शर्माला विचारले,”तुम्ही ज्योतिषी असूनसुद्धा या मुलाखतीसाठी का आला नाहीत. तुम्हाला राज ज्योतिषी होणे आवडत नाही काय” विष्णु शर्माने सांगितले,”महाराज मी घरी बसून माझ्या स्वत:च्या पत्रिकेचा अभ्यास केला व माझ्या अभ्यासानुसार या पदावर मीच नियुक्त होणार आहे. तुम्ही मला निमंत्रण पाठवून मला बोलावून घ्याल हे मला माझ्या अभ्यासातून आधीच कळाले होते. त्यामुळे मी या पदासाठी मुलाखत देण्यास आलो नाही.  राजाला विष्णु शर्माची अभ्यासूवृत्ती व त्याचा आत्मविश्वास या दोन्हीचा अभिमान वाटून त्याने विष्णु शर्माला राज ज्योतिषी म्हणून नियुक्त केले.
तात्पर्य – ज्यांचा स्वत:वर विश्वास असतो ते कधीच हार मानत नाहीत व त्यांच्याकडे संधी आपोआप चालून येते.
*******************************************************************
लाडूची चोरी
पूर्वीच्या काळची गोष्ट आहे, दोन तरूण एका मिठाईच्या दुकानात गेले, दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहे पाहून त्यातल्या एका मुलाने जवळच असलेल्या एका थाळीतील एक लाडू उचलला आणि दुस-या मुलाच्या हाती दिला, त्याने तो लाडू पटकन खिशात टाकला, थाळीतील एक लाडू कमी झाल्याचे लक्षात येताच तो हलवाई त्या तरूणांना म्हणाला, ”तुम्ही दोघेच जण इथे आहात तेव्हा तुम्हां दोघांपैकीच कोणीतरी एकाने तो लाडू चोरला आहे, ”यावर प्रत्यक्षात लाडू चोरणारा तरूण म्हणाला, ”देवाशप्पथ, मी खरं सांगतो की लाडू माझ्याकडे नाही.” ज्याच्या खिशात तो लाडू होता, तो तरूण म्हणाला,” देवाशप्पथ खरंच सांगतो मी लाडू मुळीच चोरलेला नाही.” दुकानदाराला खरे काय ते माहित असूनही केवळ यांच्या भाषिक कसरतीमुळे त्यांची चोरी सिद्ध करू शकला नाही.
तात्पर्य – भाषेच्या कसरतीमुळे एखादा इसम निरपराधी असल्याचे सिद्ध करता आले नाही तरी प्रत्यक्षात तो अपराधी असतो.
  *****************************************************************
सेवा हाच धर्म
एका पत्रकारांनी स्वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती. त्यांच्याकडून चार ज्ञानाच्या गोष्टी शिकाव्यात अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्या पत्रकारांचे दोन मित्र त्यांना भेटावयास आले व बोलता-बोलता स्वामी विवेकानंदांचा उल्लेख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्याचे ठरविले.तिघेही मिळून स्वामीजींकडे गेले. विवेकानंदांनी तिघांचीही आस्थेने विचारपूस केली.या दरम्यान स्वामीजींना असे कळाले की तिघे ही पंजाब प्रांतातील आहेत. त्या काळात पंजाबात दुष्काळ पडलेला होता.त्यांनी त्यासंदर्भात चर्चा केली.दुष्काळग्रस्तांसाठी चाललेल्या मदतकार्याची माहिती घेतली.त्यानंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्हणाले,”स्वामीजी, आम्ही तुमच्याकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आले होतो.पण तुम्ही मात्र सामान्य अशा बाबींवरच चर्चा केलीत. आम्हाला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही.” स्वामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले,” मित्रवर्य,जो पर्यत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्यापेक्षा त्याची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्त महत्वाचे आहे. ज्याचे पोट भरलेले नाही त्याला धर्मोपदेश देण्यापेक्षा भाकरी देणे महत्वाचे. रिकाम्या पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही.”
  *****************************************************************
देण्याचे महत्व
एका वृद्ध गृहस्थाला तीन मुले होती.त्याचा अंत:काळ जवळ आला तेव्हा त्याने तिघा मुलांना आपल्याजवळ बोलावले व म्हणाला, ” जेव्हा मी मरेन तेव्हा मी सांगतो त्याप्रमाणे माझी सर्व संपत्ती वाटून घ्या. मोठ्या मुलाने अर्धी मालमत्ता घ्यावी.मधल्या मुलाने तिसरा हिस्सा  घ्यावा व तिस-याने नववा वाटा घ्यावा.” हे सांगितल्यावर मुलांनी त्या गोष्टीला होकार दिला.काही दिवसांनी वृद्धाचे निधन झाले.क्रियाकर्म पूर्ण झाल्यावर मुलांनी मालमत्तेचा हिशोब केला तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की आपल्याकडे 17 उंट आहेत पण वडिलांनी सांगितल्याप्रमाणे 17 उंटांची वाटणी नीट प्रमाणात होत नाही हे कळताच तिघेही भांडू लागले. त्यावेळेस त्यांच्या वडिलांचे एक वर्गमित्र म्हणाले,”मुलांनो तुम्ही मला माझ्या मुलांसारखेच आहात. एका उंटाचाच फक्त प्रश्न आहे तर तो मी सोडवतो, माझ्याकडील एक उंट तुम्हाला घ्या व तुमचा प्रश्न सोडवा. आता उंटांची संख्या 18 झाली. मग पुन्हा वाटणी केली तेव्हा मोठ्या मुलाला अर्धा वाटा म्हणजे (9उंट)मिळाले, मधल्या मुलाला तिसरा वाटा (6उंट) आणि धाकट्याला तिसरा वाटा (2उंट) मिळाले. मुले समाधानी होऊन आपापला वाटा घेऊन गेली.वडिलांचे मित्र तिथेच थांबून राहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की वाटणीसाठी दिलेला उंट वाटणी होऊन सुद्धा तसाच शिल्लक होता.त्यांनी ईश्वराचे आभार मानले.
तात्पर्य :- सृष्टीचा नियम आहे की ”जितके द्याल तितकेच भरभरून तुम्हालाही मिळेल.”
  *****************************************************************
मुर्ख डोमकावळा
एका गरूडाने कुरणात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्या कोकराला पळवून नेले. त्याचे हे धाडस आणि सामर्थ्य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्या गरूडाकडे भीतीयुक्त आदराने पाहू लागले.’गरूडाने पळवलेत्या पेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्मान वाढेल, त्याच्या इतकीच प्रतिष्ठा आपल्याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले.त्यासाठी त्याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्या पाठीवर बसून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण ते कोकरू उचलले जाण्या ऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्या पाठीवरील लोकरीमध्ये अडकले व तिथून सुटण्यासाठी त्याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्या कानी गेली. तो तिथे आला व त्याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्याला स्वत:च्या मुलांच्या स्वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,”बाबा या पक्ष्याचे नाव काय हो” यावर तो मेंढपाळ हसून म्हणाला,” या मूर्ख पक्ष्याला जर तुम्ही याचे नाव विचारले तर हा स्वत:ला गरूडापेक्षा ही श्रेष्ठ असा पक्षी म्हणून स्वत:ची ओळख करून देईल पण प्रत्यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.”
तात्पर्य – काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्याची प्रचंड सवय असते. यामध्ये त्यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञलोक हे त्यांची पात्रता जाणून असतात.
  *****************************************************************
विजय असो
एकदा एका गावात दोन कोंबड्यांची झुंज सुरु झाली.भांडणाचे कारण ही भारीच होते, एका कोंबडीशी कुणी लग्न करायचे यावरून त्या दोघांत खूप भांडणे झाली व त्याचे पर्यवसान झुंजीत झाले.अटीतटीच्या झुंजीत दोघेही एकमेकांवर प्रहार करू लागले.मारामारीत दोघांचेही अंग रक्तबंबाळ झाले, त्यातील एकाने मग रक्तबंबाळ झाल्याने सरळ पळून जाऊन आपल्या खुराड्याचा आधार घेतला व तिथूनच तो आणि ती कोंबडी बाहेर काय चालले आहे हे पाहू लागले.भांडणात खुराड्याच्या बाहेर असलेल्या कोंबड्याला हा आपला विजय वाटून त्याने घराचे छत गाठले व तिथून जोरजोराने त्या कोंबडीकडे बघून ”मी जिंकलो, मी जिंकलो” असे ओरडू लागला, स्वत:चाच जयघोष करू लागला. तेवढ्यात वरून एक गरूड आला व त्याने त्या ओरडणाया कोंबड्याला उचलले व लांब जाऊन त्याने त्याला मारून खाऊन टाकले. हे पाहिल्यावर पराभूत झालेला कोंबडा व कोंबडी बाहेर आले तेव्हा तो कोंबडा कोंबडीला म्हणाला,”मी जर बाहेर राहिलो असतो तर त्या कोंबड्यासारखीच माझी हालत झाली असती. मी माझ्या जीवाला जसा जपतो तसाच तुलाही जपेन.”
तात्पर्य – ज्याच्या डोक्यात यशाची हवा चढते तेव्हाच त्याच्या पराजयाची सुरुवात होते. यश पचविता येणे ही एक मोठी गोष्ट आहे.
  ******************************************************************
परोपकार
एका गावात एक निर्धन मनुष्य राहत होता. परिस्थिती गरीबीची असूनही तो मनाने उदार होता. आपल्या घासातील घास देण्यासही तो कमी पडत नसे. एकदा एका शेठजीकडे तो जेवावयास गेला असताना त्या शेठजीने त्याला पंचपक्वान्नाचे ताट वाढून दिले. ती भरगच्च पदार्थांनी भरलेली थाळी बघून त्या गरीबाला वाटले की यातून किमान तीन माणसांची भूक भागू शकेल. त्याने शेठजीची परवानगी मागितली व त्यातील अन्न त्याने बरोबर घेतले व घराकडे जाण्यास निघाला. रस्त्यात त्याला एक भिकारी भेटला त्याला त्याने खायला दिले. त्यातून उरलेले अन्न घेऊन तो घरी आला, तो जेवायला बसणार इतक्यात एक भिक्षुक या माणसाच्या घरी आला व त्याने त्याला अन्नदान करण्याची विनंती केली. गरीबाने त्याच्या समोरील ताट त्या भिक्षुकाच्या स्वाधीन केले. त्यानंतर अजून एक अपंग व्यक्ती दाराशी आली त्यानेही या गरीबाकडे अन्न मागितले त्याला ही आपल्या थाळीतील अन्न खायला दिले.आता याच्याकडे देण्यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही तेव्हा याने स्वत:ची भूक भागविण्यासाठी एक भांडेभर पाणी घेतले तर समोरून एक वृद्ध व्यक्ती आली व तिने ते पाणी पिण्यासाठी मागितले. याला आता खाण्यापिण्या सारखे काहीच उरले नाही तरीही ही व्यक्ती समाधानात होती आजचा दिवस आपल्यामुळे किमान चार लोकांना तरी खाण्यापिण्यास मिळाले.तो ह्याच विचारात असताना तेथे देव प्रगटले व म्हणाले,’मी तुझी परीक्षा घेण्यासाठीच भिकारी, भिक्षुक, अपंग आणि वृद्ध व्यक्तिचे रूप घेतले होते व तुझ्याकडून काहीना काही मिळते का नाही हे पाहिले आणि तु स्वत:चा विचार न करता दुस-याचा जीव जाणून घेतलास व देत राहिलास. आता या पुढे तुला काहीच कमी पडणार नाही असा मी तुला वर देतो.” इतके बोलून देव अंतर्धान पावले.
तात्पर्य – देण्यातच खरे सुख लपलेले आहे. कुणाचाही घास हिरावून घेण्यापेक्षा कुणाला तरी एखादा घास देता कसा येईल याचा विचार करणे यातच खरे सुख लपलेलेआहे.
  ******************************************************************
सत्तेचा सुविनियोग
   एक  राजा  होता. त्याचे  सुखी  व  संपन्न  राज्य  होते. दुर्दैवाने  एकदा  त्याच्या  राज्यात  पाऊसच  पडला  नाही.  त्यामुळे  दुष्काळाचे  संकट  उभे  ठाकले. गरिबांचे  हाल  होऊ लागले. बादशहाने  आपला  खजिना  जनतेसाठी  खुला  केला. एके दिवशी  तो  खजिनाही  संपला. आता  पुढे  काय  हा प्रश्न  राजासमोर  उभा  ठाकला. प्रजाजनांचे  पोषण  कसे  करता  येईल  ही एकच  चिंता  राजाला  सतत  सतावित  होती. त्याने  त्याच्या  बोटातली  हि-याची अंगठी नोकरांना दिली  व  सांगितले, ”ही  अंगठी  घेऊन  शेजारच्या  देशात जा, तेथील  राजाला  आपली  सर्व परिस्थिती  सांगा. तो  राजा  आपली अवस्था  जाणेल  व हा हिरा फार दुर्मिळ आहे. या  हि-याच्या बदल्यात त्याच्याकडून धान्य मागून आणा व जनतेत वाटप करा. ” मंत्र्यांनी राजाला विचारले,”राजन, इतका महागडा, दुर्मिळ हिरा तुम्ही का विकत आहात, दुसरी काहीतरी सोय करता येईल.” राजा म्हणाला,”माझे राज्य ही माझी संपत्ती आहे. प्रजा उपाशी मरत असताना मी महागडा हिरा का सांभाळत बसू. प्रजा आहे तर मी आहे. असे हिरे पुन्हा प्राप्त करता येतील पण प्रजा एकदा जर नाराज झाली तर पुन्हा अशी प्रजा मला मिळणार नाही.”
तात्पर्य :-
आपल्या हाती जर सत्ताअसेल तर त्याचा योग्य विनियोग कसा करता येईल हे पहाणे इष्ट ठरते.
   **********************************************************************
सत्तेचा सुविनियोग
एका नगरात एक पुजारीबाबा राहत होते. शेजारच्या गावातील पुजाऱ्याचे अकस्मात निधन झाल्याने या पुजारीबाबाना त्या गावात पुजारी म्हणून नियुक्त केले गेले. एकदा त्या गावी जाण्यासाठी पुजारी बाबा बसमध्ये चढले, त्यांनी कंडक्टरला पैसे दिले आणि ते आपल्या जागेवर जाऊन बसले. कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले व उरलेली रक्कम पुजारीबाबाना परत केली तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले कि त्यात १० रुपये जास्त आले आहेत. पुजारीबाबानी असा विचार केला कि आता कंडक्टर घाईत आहे तेंव्हा त्यांना थोड्या वेळाने पैसे परत करू या. काही वेळ झाला कंडक्टर अजूनही त्याचे तिकिटे देण्याचे काम करतच होता. पुजारीबाबांच्या मनात एक विचार आला कि आता तर कंडक्टर इतका घाईत आहे कि त्याला ते १० रुपये परत केले काय आणि नाही केले काय काय फरक पडणार आहे. सरकारी बस कंपनी इतके पैसे मिळवते प्रवाशांकडून मग इतक्या छोट्या रकमेने त्यांना काय होणार? लाखो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून हे १० रुपये आपल्या सारख्या पुजाऱ्याला भेट मिळाले असेच आपण समजू. आपण याचा काही तरी सदुपयोग करू शकू. पुजारीबाबांच्या मनात असे विचार चालू असतानाच त्यांचे उतरायचे ठिकाण आले. बसमधून उतरताना अचानक त्यांचा हात खिशाकडे गेला व त्यातून ती दहा रुपयाची नोट त्यांनी बाहेर काढली व कंडक्टरला परत दिली व म्हणाले,”भाऊ !! तुम्ही मघाशी मला तिकिटाचे पैसे परत करताना घाईगडबडीत हे दहा रुपये जास्त दिले आहेत.” कंडक्टर हसून म्हणाला,”महाराज! तुम्हीच या गावाचे नवे पुजारी आहात का?” पुजारीबाबा हो म्हणाले. त्यावर कंडक्टर पुन्हा बोलू लागला,” महाराज, माझ्या मनात तुमचे प्रवचन ऐकण्याची खूप इच्छा होती. तुम्हाला बसमध्ये चढताना पाहिले आणि मनात एक विचार आला कि चला आपल्याला या कामामधून वेळ मिळत नाही आणि तुमची भेट घडून येत नाही तेव्हा तुम्ही जसे प्रवचनात उपदेश करता ते आचरणात आणता काय याचा पडताळा घ्यावा म्हणून मी ते दहा रूपये तुम्हाला मुद्दाम जास्त दिले होते. पण मला आता कळून चुकले आहे की तुम्ही जसे बोलता तसेच तुमचे पवित्र आचरण आहे. महाराज मला क्षमा करा.” एवढे बोलून कंडक्टरने गाडी पुढे जाण्यासाठी बेल वाजवली. पुजारीबाबांना आता घाम फुटला होता, ते घाम पुसत आकाशाकडे पहात म्हणाले,” प्रभो, तुझी लीला अपरंपार आहे, दहा रूपयांचा मोह मला आत्ता किती महागात पडू शकला असता पण तुम्ही मला त्यातून वाचवले. देवा तू खरंच दयाळू आहेस. अचानक का होईना त्या दहा रूपयांच्या मोहातून तू मला बाहेर काढले व समाजात होणारी माझी बदनामी थांबवली. तात्पर्य – मोह हा वाईट असतो, ज्याक्षणी मोहाने मन ग्रासते त्याक्षणीच मानव प्रगतीकडून अधोगतीकडे प्रवास करू लागते.

1 comment:

  1. आपल्याला 100% कर्ज हवे आहे का? मी आपल्या आर्थिक गरजांना परताव्याच्या कमी समस्यांसह सर्व्ह करू शकतो म्हणूनच फक्त 2% साठी आम्ही आपल्याला निधी देतो. जे काही तुमची परिस्थिती, स्वयंरोजगार, सेवानिवृत्त, योग्य क्रेडिट रेटिंग आहे, आम्ही मदत करू शकतो. 1 ते 30 वर्षांपर्यंत लवचीक परतफेड. आमच्याशी संपर्क साधा: comfortfrankloanfirm@gmail.com






    आपण एक लांब किंवा अल्पकालीन कर्ज शोधत आहात

    1 पूर्ण नाव: ............................
    2 संपर्क पत्ता: .......................

    3.देश: .....................

    4.सैक्स: ...............

    5. कर्जाची रक्कम आवश्यक आहे: ....................
    6. कालावधी कर्ज: ...................
    7. डायरेक्ट टेलीफोन नंबर: .....................

    खूप प्रेम,

    Comfortfrankloanfirm@gmail.com



    एल
    Mrs: सोई

    ReplyDelete